संतोष मेश्राम चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला यांचे आदेशान्वये जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष समृद्धी भीष्म यांचे मार्गदर्शनानुसार राजुरा तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय राजुराचे वतीने भारतीय संविधान दिनानिमित्य शहरातून घोषणा देत जनजागृती रॅली काढण्यात आली.
विद्यार्थी तथा सर्वसामान्य जनतेला भारतीय संविधान आणि त्यातील मूलभूत अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून सकाळी साडे आठ वाजता राजुरा न्यायमंदिर येथून ही रॅली निघाली. शहरातून फिरून रॅली परत न्यायालय प्रांगणात आली. रॅलीत संविधान विषयक जनजागृतीचे फलक व सविधांनाचे महत्व सांगणारे स्लोगन अधोरेखित करीत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या रॅलीत सहभाग घेतला. वकील, न्यायालयातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी, शिक्षक या रॅलीत सहभागी झाले.
यानंतर न्यायालय प्रांगणात संविधान जनजागृती कार्यक्रम झाला. दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा धनश्री आर. भंडारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी सह दिवाणी न्यायाधीश विद्या कसबे, सह दिवाणी न्यायाधीश निखिल हेमणे, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष निनाद येरणे उपस्थित होते.
यावेळी आपले विचार मांडताना मा. न्यायाधीश धनश्री भंडारी म्हणाल्या की, हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून प्रत्येक नागरिकाने या दोन्हीच्या बाबतीत जागरूक असले पाहिजे. आपल्या देशाचे संविधान बनविताना संविधानकारांनी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यातून चांगले ते घेऊन एक प्रभावी व सर्व समावेशक संविधान आपल्याला दिले आहे. त्याची जाण ठेवत सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन सर्वत्र साजरा करण्याची आवश्यकता असून त्यामुळे संविधानात अंतर्भूत अनेक बाबी नागरीकांना कळून जन जागृती होईल, असे मत मा. भंडारी यांनी मांडले. यावेळी त्यांनी संविधान मार्गदर्शिकेचे वाचन करून सामूहिकपणे विद्यार्थ्यांकडून वाचन करविले.
या कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ लिपिक बी.एफ.वडस्कर आणि आभार कनिष्ठ लिपिक अजय गोंगले यांनी मानले. या कार्यक्रमाला राजुरा ठाणेदार संतोष दरेकर, ॲड.अरुण धोटे, ॲड. राजेंद्र जेनेकर, ॲड.मारुती कुरवटकर, मुख्याध्यापिका छाया गोखरे, पोलिस व न्यायालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

