लेखक: रणजित मेश्राम रा. नागपूर
जेष्ठ साहित्यिक व विचारवंत
२६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान संमत (acceptance) झाले. २६ जानेवारी १९५० ला संविधान लागू ( implement – अंमल ) झाले. महज, केवळ दोन महीन्यांचे अंतर !
हे दोन महिने कसे संलग्नित करायचे ? २६ जानेवारी तर गणराज्य दिवसात सजतो. खूप नटतो. नटावेही ! जणू दूसरे… स्वातंत्र्य दिवस ! आजपासून लोकांचे राज्य आले… प्रजासत्ताक झाले… असेअसेच ! आजपासून संविधान लागू झाले .. संविधानाचे राज्य आले… असे क्वचितच !
संविधान दिनाचेही असेच होते की काय ? एखादी महत्ता क्षीण करायची असेल तिचा उत्सव करून टाकावा ! महत्ता तशीच सरते ! उत्सव खूप सजतो. अंमल रडत बसतो.
मधल्या काळात सीपीएम ने संविधान अंमलबजावणीचे मूल्यमापन यावर विशेष संसद सत्राची मागणी केली होती. पण तो पक्ष सध्या कमी ताकदीचा असल्याने दखल घेतली गेली नाही.
मागणी तशी अत्यंत दूरदर्शी व कल्याणकारी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः याबाबत फार सावध होते. म्हणून संविधान देतांना ते स्पष्ट म्हणाले होते, ‘ संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.
संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरुपावर नसतो.संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्यांच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे.
भारतातील लोक आणि त्यांचे राजकीय पक्ष कसे वागतील हे कोण सांगू शकेल ? आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी ते संवैधानिक मार्गाचा अवलंब करतील की बदलकारी मार्गाचा अवलंब करतील ? त्यांनी बदलकारी मार्गाचा अवलंब केल्यास संविधान कितीही चांगले असो ते अयशस्वी होईल.’
अर्थात बाबासाहेबांचा हा गंभीर इशारा लक्षात घेता संमत हे अंमल कडे जाईल तो सुदिन !
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

