मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसापासून क्राईम ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चोरी, दरोडे, हत्या, महिला अत्याचाराच्या भयंकर अशा घटना घडत असल्यामुळे पोलिस व्यवस्थेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसावा किंबहुना गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या मूलभूत सुविधांचा विकास योजनेतून १५ कोटी रुपयांचा निधी सीसीटीव्हीसाठी मंजूर केला आहे.
संपूर्ण नाशिक शहर हे सीसीटीव्ही च्या कक्षेत येणार असल्याने शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी हातभार लागणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड, मद्यपींकडून सतत होणारी गुंडागर्दी, शहरात वेगाने वाहन चालविणाऱ्या मद्यपींकडून सतत होणारे अपघात आदी गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. शहराच्या वाढत्या व्याप्तीमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. सक्षम पुरावे हाती येत नसल्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे अवघड होत असते. यातूनच शहरभर सीसीटीव्ही असावेत, अशी मागणी सातत्याने होत असल्याने खासदार गोडसे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीतही खासदार गोडसे यांनी सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली. या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
सीसीटीव्हीबरोबरच जुने सायट्रिक इंडिया कंपनी ते पंचक चौकदरम्यानचा रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. २४ मधील शिवालय कॉलनी येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडाचे सुशोभीकरण व रस्ता, प्रभाग क्र. २७ मधील श्रीकृष्णनगर येथे सांस्कृतिक भवन बांधणे, प्रभाग क्र. ३१ मधील अंबड गावात सभामंडप बांधणे, प्रभाग क्र. २ मधील नांदूर गावात सभामंडप बांधणे, प्रभाग क्र. २ मधील मानूर गावात सभामंडप बांधणे, प्रभाग क्र. २७ मधील राजे संभाजी स्टेडियमचे विद्युतीकरण व सुशोभीकरण, प्रभाग क्र. २७ मधील मीनाताई ठाकरे उद्यान अश्विननगर येथे महिलांसाठी अभ्यासिका, सिंहस्थनगर परिसराचे सुशोभीकरण, प्रभाग क्र. ३१ मधील चेतनानगर येथे सामाजिक सभागृह व सुशोभीकरण करणे या विकासकामांसाठी प्रत्येकी ५० लाखांच्या निधीला तसेच प्रभाग क्र. ३ मध्ये अभ्यासिका बांधणे, प्रभाग क्र. १ मधील सुशोभीकरण करणे या कामांसाठी प्रत्येकी ३० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

