✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- मध्यवर्ती कारागृह नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. त्यामुळे नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह प्रशसनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. देशातील सुरक्षित कारागृहा पैकी नागपूर येथील कारागृहाचे नाव येत. पण आज नागपूर येथील कारागृह गांजा आणि मोबाईलच्या तस्करीमुळे प्रकाश झोतात आहे.
दोन महिन्यांपूर्वी मोबाईल, बॅटरी आणि गांजा मोठ्या प्रमाणात येत असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्च ऑपरेशन राबविले होते. परंतु पुन्हा एकदा कारागृहात पोलिस शिपायांच्या मदतीने कुख्यात गुन्हेगारांना राजरोसपणे गांजा, मोबाईल पुरविल्या जात असल्याचे रॅकेट समोर आले असून याप्रकरणी धंतोली पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे.
कुख्यात श्रीकांत थोरात, गोपाल पराते, राहुल मेंढेकर यांच्यासह पोलिस कर्मचारी अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. श्रीकांत थोरात, गोपाल पराते, राहुल मेंढेकर या तिघांवरही मोका आणि एमपीडीएअंर्गत कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांनंतर ते बाहेर आले. त्यापूर्वी कारागृहात त्यांची निषेद वासनिक आणि वैभव तांडेकर यांची ओळख झाली. निषेद वासनिक याने आठ महिन्यापूर्वी क्रिप्टो करन्सीच्या नावाने अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी त्याला लोणावळ्यातून अटक केली होती.
कारागृहात असताना झालेल्या मैत्रीतून श्रीकांत, गोपाल आणि राहुल बाहेर पडताच त्यांच्या माध्यमातून बनावट कागद पत्रांच्या आधारे सिम खरेदी करीत, अजिंक्य आणि प्रशांत राठोड यांच्यामार्फत निषेद आणि वैभव यांच्याकडे त्यांनी पाठविले. त्यानंतर अनेकदा व्हॉट्सॲपद्वारे चिठ्ठीच्या माध्यमातून त्यांनी गांजा आणि इतर साहित्यही कारागृहात मागविल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशांत व अंजिक्य हे साहित्य वासनिकला पोहोचवायचे. कारागृहात मोबाइलचा वापर होत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली. त्यांनी गुन्हेशाखेला गोपनीय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी युनिट- २ चे किशोर पर्वते यांच्या पथकाने आरोपींना अटक करीत धंतोली पोलिसांच्या स्वाधीन केले.
कर्मचारी व अधिकारीही रडारवर
कारागृहात मोबाईल आणि गांजा सर्रासपणे नेण्यात येत असताना अनेकदा त्यात पोलिस शिपायांचा सहभाग असल्याची बाब उघडकीस आली आहे. यानंतरही कारागृह प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याने अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच हे सर्व घडवून आणण्यात येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे याप्रकरणात कारागृहातील काही अधिकारीही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

