✒️वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
भंडारा:- जिल्हातून मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर शाळेच्या परिसरात पायावर पाय ठेऊन बसल्याचे पाहून भडकलेल्या एका शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. निर्दयीपणाचा कळस गाठणारी ही घटना तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये घडली. या प्रकरणी मंगळवारी गोबरवाही पोलीस ठाण्यात शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल मेश्राम, असे या शिक्षकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी शाळा सुटल्यानंतर चिखला येथे जाणा-या बसबाबत सूचना न मिळाल्याने मयंक प्यारेलाल धारगावे वय 15 वर्ष, रा. चिखला हा आपल्या मित्रांबरोबर शाळेच्या परिसरात बसून होता. तेथे पायावर पाय ठेऊन विद्यार्थी बसले होते. या सुमारास शिक्षक मेश्राम तेथे आला. पाय सरळ ठेऊन बसा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना बजावले. अशातच, शिक्षकाने तुला समजत नाही का, असे म्हणत मयंकला लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाण मुळे असह्य मयंक जोरजोराने ओरडायला लागला. काही वेळातच तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला.
हा सर्व प्रकार मयंक बरोबर बसून असलेले त्याचे मित्र बघत होते. काही मित्रांनी चिखला येथे जाऊन मयंकच्या वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. थोड्याच वेळात शाळा व्यवस्थापननेही मुलाला तुम्ही शाळेत येऊन घेऊन जा, असे सांगितले. यावरून वडील प्यारेलाल आणि आई शाळेत पोहोचले. मयंक शाळेच्या परिसरात पडून होता. बाजूला शिक्षक उभे होते. वडिलाने मयंकला गोबरवाही आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर गोबरवाही ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शिक्षक कोमल मेश्राम विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.