✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
नागपूर:- येथील मध्यवर्ती कारागृहातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमी चर्चेत राहते. आता कारागृहात एका कैद्याचा मृत्यू प्रकरणी परत चर्चेत आले आहे.
मोक्का या गंभीर गुन्ह्यातील कैद्याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, कैद्यांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही कैद्यांनी तुरुंग रक्षकाने मारहाण केल्यामुळे कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तुरुंग अधिकाऱ्याला घेराव घातल्याची माहिती आहे.
मोक्का या गंभीर गुन्ह्यातील कैदी सौरभ तायवाडे वय 24 वर्ष, रा. पाचपावली असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. तो पाचपावली पोलीस ठाण्यातील हद्दीतील मोक्का गुन्ह्यातील आरोपी आहे. शुक्रवारी सकाळी त्याच्या छातीत दुखत असल्याची माहिती त्याने तुरुंग रक्षकाला दिली होती, परंतु तरुंग रक्षकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर जेवणाच्या रांगेत उभे असताना त्याने प्रकृतीबाबत तुरुंग रक्षकाला सांगितले. मात्र, रक्षकाने त्याच्या कानशिलात लगावल्याने तो खाली पडला आणि त्याची प्रकृती जास्तच खालावली. त्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. कैद्याच्या मृत्यूचे वृत्त कारागृहातील इतर कैद्यांना समजताच 70 ते 80 कैद्यांनी याबाबत संताप व्यक्त करत तुरुंग अधिकारी कुमरे यांना घेराव घातला.
तसेच तुरुंग रक्षकाने मारहाण करून वेळेवर दखल न घेतल्याने सौरभचा मृत्यू झाल्याचा आरोप सबोत असलेल्या कैद्यांनी केला. तसेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्य़ंत बराकीत जाणार नसल्याचा पवित्रा कैद्यांनी घेतला. त्यानंतर तुरुंग अधिकारी कुमरे यांनी धंतोली पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांचा ताफा कारागृहात दाखल झाला.
धंतोली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कैदी आपल्या बराकीत गेले. या घटनेबाबत कारागृह प्रशासनाने गुप्तता पाळली होती. मात्र, पोलीस स्टेशन पर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर हा प्रकार समोर आला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

