आजचा विजय म्हणजे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने दाखविलेला विश्वास! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर, दि. २० डिसें:- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टी प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून ५९ ग्रामपंचायतींपैकी भारतीय जनता पार्टीने २४ जागांवर विजयी मिळविला तर युतीमध्ये ४ जागांवर विजय मिळवित २८ जागांवर विजय प्राप्त करत पुन्हा एकदा अव्वल स्थान राखले आहे. भारतीय जनता पार्टीचा आजचा विजय म्हणजे लोकनेते, विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने दाखविलेला विश्वास असून येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास आम्ही अधिक वेगाने करू असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीपैकी भाजपाने २४ जागा व युतीत ४ जागा असे एकूण २८ जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यानुसार नागभिड तालुक्यात भाजपाने १, सिंदेवाही येथे २ पैकी २, सावली येथे १, चिमुर येथे २, बल्लारपूर येथे २, भद्रावती येथे ५, राजुरा येथे १, पोंभुर्णा येथे १, कोरपना येथे भाजप २ तर युतीत ४, जिवती येथे २, मुल येथे ३ अशा जागांवर भाजपाने विजय संपादन केला आहे.
मागील वर्षी जानेवारी २०२१ मध्ये राज्यात मविआचे सरकार असतांना सुद्धा जिल्ह्यात झालेल्या ६०० ग्रामपंचायतींच्या निवडणूकांतही जवळपास ३४० च्यावर ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने सत्ता काबीज केली होती. यासोबतच याचवर्षी ऑक्टोंबर महिन्यात पार पडलेल्या ९४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत तब्बल ४७ जागी विजय संपादित करून भाजपने विजयश्री खेचून आणली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ५९ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवत भाजपने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
अभुतपूर्व विकासकामे व लोककल्याणकारी उपक्रम या माध्यमातुन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य जनतेशी राखलेली बांधिलकी व तळागाळातील सामान्य जनतेचे केलेले कल्याण यातुनचं हा विजय साकारला असल्याचे देवराव भोंगळे यांनी म्हटले. पुढील काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करून ग्रामीण भागाचा कायापलट करण्यात येईल, असेही देवराव भोंगळे यांनी म्हटले आहे. या विजयासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांचे आभार ही त्यांनी व्यक्त केले आहे.