✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील कारंजा पोलीस ठाण्यात साडे आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला पथकाला यश आलं आहे. डोरीलाल ऊर्फ राजू बन्सीलाल नागवंशी रा. जरुड, ता. वरुड, जि. अमरावती असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तीन गायींची चोरी आणि पैशांच्या वादातून त्याची सावळी खुर्द येथील ओम नामदेव पठाडे वय 36 वर्षे आणि सुनील वामन ढोबाळे या दोघांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे. या दोघांनाही अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील हेटीकुंडी फाट्याजवळ जवळपास साडेआठ महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपासाची नवी रणनीती ठरवून सुरुवातीपासून तपासचक्र फिरवले असता साडेआठ महिन्यानंतर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन गायींची चोरी व पैशाच्या वादातून राजू बन्सीलाल नागवंशी याची हत्या करण्यात आली.
रहस्य उलगडलं..
पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आणि योग्य पद्धतीने विचारणा केली असता ओम पठाडे त्याच्याकडील तीन गायी राजू नागवंशीने चोरील्या आणि त्या परस्पर विकल्या. शिवाय उसणे घेतलेले 14 हजार रुपये परत देण्यासाठी नकार देत होता. याचाच राग मनात धरुन नियोजनबद्धपणे हत्येचा कट रचण्यात आला. डोरीलाल याला दुचाकीने वर्धा जिल्ह्यात आणून त्याच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करुन त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरुन पोबारा केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, स्थानिक गुन्हे शाखेचे संजय गायकवाड, राजपुत, अमोल लगड, रणजित काकडे, राजेश तिवस्कर, विकास अवचट, प्रदीप वाघ, गोपाल बावणकर, अंकित जिभे यांच्यासह सर्व स्थानिक गुन्हे शाखा तसेच कारंजाचे पोलीस कर्मचारी कापटे यांनी केली आहे.

