✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.4:- नागपुर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने परिपुर्ण तयारी केली आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यात 14 मतदान केंद्र राहणार असून 4 हजार 861 शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदान केंद्र, केंद्रांवर मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्तासह निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
या निवडणूकीसाठी तयार करण्यात आलेल्या विविध पथकांना आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी सोपान कासार,निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह महसुल, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार नोंदवावयाची असल्यास नोंदवता येतील. या निवडणूकीत जिल्ह्यातील 4 हजार 861 शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात 2 हजार 937 पुरुष तर 1 हजार 924 महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकून 14 मतदान केंद्र राहणार आहे. त्यात आष्टी, कारंजा, आर्वी, रोहणा, सेलू, सिंदी रेल्वे, देवळी, पुलगाव, समुद्रपुर, हिंगणघाट व वडनेर येथे प्रत्येकी एक तर वर्धा येथे 3 केंद्रांचा समावेश आहे.
मतपत्रिकेद्वारे होणार मतदान
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ईलेक्ट्रॅानिक व्होटींग मशिनचा वापर केला जात नाही. त्यामुळे पारंपरिक पध्दतीने मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांवर दोन मतदान पेट्या व एक राखीव याप्रमाणे मतपेटया उपलब्ध करुण देण्यात आल्या आहे.
भरारी, निगराणी व खर्च पथकांचे प्रशिक्षण
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी विविध पथकांचे गठण करण्यात आले आहे. यादरम्यान मतदान जनजागृती देखील केली जाणार आहे. निवडणूकीसाठी गठीत करण्यात आलेल्या पथकांमध्ये भरारी पथके, व्हिडीओ निगराणी पथके, खर्च विषयक पथकांचा समावेश आहे. तालुकास्तरावर या समित्या नेमण्यात आल्या असून या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. तालुकानिहाय नेमण्यात आलेल्या भरारी पथकात कर्मचारी, अधिकारी, पोलिस अधिकारी व व्हिडिओग्राफरचा समावेश आहे.

