मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हस्तक्षेप करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सुचना
तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर / यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाणीव्दारे भु-संपादनाची कार्यवाही न करता संपादन प्रक्रियेपूर्वीच खनन कार्य सुरु केल्यामुळे मागासवर्गीय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच प्रदुषणात वाढ झाली आहे. संबंधीत शेतकरी न्याय मागण्यांसाठी आंदोलन करित आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याविषयी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सदर तक्रारीची दखल गांभीर्याने घेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेवून अन्याय ग्रस्त मागासवर्गीय शेतकऱ्यांवर भुमी अधिग्रहणा बाबत होत असलेला अन्याय दूर करुन अधिग्रहणा पूर्वी बी. एस. इस्पात कंपनीव्दारा होत असलेले उत्खनन न्यायसंगत आहे काय? अशी विचारणा करीत तातडीने हस्तक्षेप करण्याच्या सुचना देवून सविस्तर कार्यवाही अहवाल सादर करण्यास सुचित केले आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्यामुळे संबंधीत शेतकऱ्यांमध्ये न्यायाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.