मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्याने दि.२३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची शिवसेना जिल्ह्याचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्याचे सह-संपर्क प्रमुख राजेश सराफ यांचे मार्गदर्शनात जिल्हा प्रमुख गणेश इखार, जिल्हा संघटक संदीप इंगळे, युवासेना जिल्हाप्रमुख निखिल सातपुते यांचे प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून सकाळी ११ वाजता ठाकरे मार्केट स्थित संपर्क कार्यालयात राजेश सराफ यांचे अध्यक्षतेत नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे सामूहिक अभिवादन करण्यात येणार आहेत. यावेळेस बाळासाहेबांची शिवसेना पक्ष सचिव यांनी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र देऊन घोषणा करण्यात येणार आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख निखिल सातपुते यांचे नेतृत्वात युवासेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे पुस्तकालयाचे उदघाट्न सहसंपर्क प्रमुख राजेश सराफ यांचे हस्ते करण्यात येणार आहेत या पुस्तकालयात रोजगारभिमुख पुस्तके वाचकासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच सिंदी (मेघे) येथील स्मशान टेकडीवरील शिवमंदिर परिसरात वृक्षारोपण, पिपरी (मेघे) येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्ठान व फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमात शिवसैनिकांनी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान वर्धेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बोकडे यांनी केले आहे.