अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गेल्या ९३ वर्षांत माध्यमांमध्ये अनेक स्थित्यंतरे आली, पण रेडिओचं महत्त्व कमी झालेलं नाही. कोणत्य़ाही ठिकाणी अगदी सहजपणे ऐकता येणारे माध्यम म्हणून आजही रेडिओकडे पाहिले जाते. अर्थात काळानुसार त्यात बदल झाले. जागतिक रेडिओ दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. याच अनुषंगाने मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे १३ फेब्रुवारी २०२५ ला जागतीक रेडिओ दिनाचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, प्रमुख पाहूणे डॉ. सपना जयस्वाल उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांनी रेडिओ दिनाचे महत्व सांगीतले. मार्गदर्शक शितल कारमोरे यांनी महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. पण प्रवासाचा वेळ जेवढा वाढत आहे, तेवढं रेडिओ ऐकण्याचं प्रमाणही वाढत आहे. म्हणूनच नवनवे रेडिओ चॅनेल्स येतच आहेत असे भाष्य केले. तसेच या कार्यक्रमाचे अतिथी डॉ. सपना जयस्वाल यांनी मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजासाठी सरकारने कम्युनिटी रेडिओची संकल्पना सुरू केली आहे. काही विद्यापीठांचे देखील स्वत:चे कम्युनिटी रेडिओ आहेत. सध्यस्थितीत भारतात २५१ कम्युनिटी रेडिओ आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात २२ असल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाची प्रास्ताविका तसेच मुख्य अतिथी बद्दल स्वागतपर भाषण प्रा. स्नेहा सु. सांगोले यांनी दिले. यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या माध्यमातून रेडिओ दिनाचे महत्व सांगण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत संबोधी मेश्राम आणि श्रेया पुसदेकर यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. साधना चिकटे तर आभार प्रदर्शन कु. स्वाती बाकडे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थीनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी कार्यक्रमाला मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थीनीची उपस्थिती लाभली होती.

