✒️मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- काल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला त्यामुळे उद्धव ठाकरे गटात एक नवीन चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते आहे. यावेळी खासदार संजय राऊत हे त्यांच्या भांडुपमधील निवासस्थानी पोहचले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिली. 103 दिवस तुरुंगात होतो, आता 103 आमदार निवडून आणणार’, असे शिवसेना नेते (ठाकरे गट) संजय राऊत म्हणाले आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमपीएल कोर्टाने जामीन मंजूर केला.
संजय राऊत म्हणाले, 100 दिवसांनी मी इथे आलोय. आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो. मी जाताना सांगितले होते की, मरण पत्करेल पण शरण जाणार नाही. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शिवसेना उद्धवस्त करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही शिवसेना बुलंद आहे, मशाल आता भडकलेली आहे. यापुढे एकच शिवसेना महाराष्ट्रात राहिल.
मला अटक केली ही देशाच्या राजकारणातील सर्वांत मोठी चूक ठरेल : संजय राऊत
मला अटक केली ही देशाच्या राजकारणातील सर्वांत मोठी चूक ठरेल. न्यायालयाने सांगितले संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे. आता तुम्हाला कळेल मला अटक करून तुम्ही किती मोठी चूक केली. या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रातले बोके खोक्यांवर बसलेले आहेत. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
तुम्ही 100 दिवसानंतरही माझं स्मरण ठेवलतं. आज रस्त्यातून येताना प्रत्येक ठिकाणी लोक अभिवादन करत होते. हे लोक मला नाही तर शिवसेनेला अभिवादन करत होते. यामध्ये अनेक मुस्लीम लोकही होते, असे राऊत म्हणाले. मला परत अटक करण्याचा प्रयत्न होईल. ज्यांनी शिवसेना फोडली, शिवसेना नाव गोठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेचे तेच वैभव वापस येईल, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

