मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिकमध्ये मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक दहशतखाली आहेत. अशातच काल वडाळा रोडवरील आयेशा नगर येथे रात्री दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका बंगल्यातच शिरकाव केल्याची घटना घडली आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच सगळीकडे दहशत पसरली आहे.
काल रात्रीच्या सुमारास एक बिबट्या एका इमारती शिरला होता. त्या बिबट्याला तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारात एका बंगल्याच्या वाहन तळातून त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले अन् परिसरातील सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नाशिक शहरातील सह्याद्री हॉस्पीटलच्या भागात रात्री साडे दहाच्या सुमारास बिबट्या दिसून आला होता. घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी दाखल झाला व बिबट्या रेस्क्यू करण्याचे काम सुुरु करण्यात आले होते. यावेळी बिबट्याचा हा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
लोकांच्या गोंधळामुळे बिबट्या घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता. बिबट्याच्या वावरामुळे महिला व लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत होते. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर रात्री बाराच्या सुमारास बिबट्याला इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले.

