महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- संगमनेरातून एक मन हेलावणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावरील नाटकी नाल्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. संकेत सुरेश नवले रा. नवलेवाडी, ता. अकोले असे मृत तरुणाचे नाव असून तो अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली होती. त्याची नेमकी कोणी व कोणत्या कारणाने हत्या केली, या बाबतचा तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.
संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून सुके वाडीकडे जाणार्या पुनर्वसन वसाहतीच्या बाजूने असणाऱ्या नाटकी नाल्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाली होती .ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नयन जाधव, पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील अण्णासाहेब दातीर, सुभाष बोडखे, अमृता आढाव, प्रमोद गाडेकर यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत त्या तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगर पालिकेच्या कुटीर रुग्णालयात पाठविला. या तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्या. तसेच शरीराच्या काही भागातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा घातपाताच केला असल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी सध्या तरी याची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
संगमनेर शहर पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या तरुणाची ओळख पटविण्यासाठी त्याचे छायाचित्र सोशल माध्यमातून प्रसारित केले होते. कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. हा फोटो इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या ग्रुपवर गेला व त्यानंतर त्या तरुणाच्या काही मित्रांनी पोलिसांशी संपर्क केला होता आणि हा तरुण संकेत सुरेश नवले वय २२, रा. नवलेवाडी, ता. अकोले असून तो अमृतवाहीनी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याची माहिती दिली.
तो सध्या खाजगी रूममध्ये मित्रांसमवेत राहत होता. संकेत हा गुरुवारी सायंकाळी मित्रांसोबत बाहेर गेला होता. त्यानंतर तो रूमवर आला नसल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले. त्याचे मोबाईल रेकॉर्ड आणि अन्य काही गोष्टींचा पोलीस बारकाईने तपास करीत आहेत. पोलिसांनी संकेतची रूम शोधली असून त्याच्या मित्रांची कसून चौकशी केली जात आहे. पुढील आधीक तपास संगमनेर पोलिस करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

