✒️वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
पुणे:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. विजेच्या धक्क्याने बाप लेकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर मधील निगडी या गावामध्ये ही घटना घडली आहे. नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना शॉक लागून या चौघांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील निगडे ता.भोर येथे नदीपात्रात मोटार टाकत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यु झाला आहे. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून मयत चौघेही निगडे गावातील आहेत. विठ्ठल सुदाम मालुसरे वय 45 वर्ष, सनी विठ्ठल मालुसरे वय 26 वर्ष, अमोल चंद्रकांत मालुसरे वय 36 वर्ष आणि आनंदा ज्ञानेश्वर जाधव वय 55 वर्ष, सर्वजण रा निगडे या चौघांचा दुर्दैवीरित्या जागीच मृत्यु झाला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निगडे गावच्या हद्दीत गुंजवणी नदीच्या पाण्यात बंधाऱ्याच्या बँकवॉटरमध्ये विठ्ठल मालुसरे यांची पाण्याची मोटार टाकण्याचे काम सुरु होते. त्यासाठी चौघेजण मोटार घेवून पाण्यात ढकलत होते. त्यावेळी विजेचा शॉक बसला. पाण्यात वीजेचा प्रवाह आल्यामुळे चौघांचाही जागीच मृत्यु झाला आहे. शेजारी शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा वीजप्रवाह बंद केला.
घटनेची माहिती मिळताच वीज महावितरणचे भोरचे उपअभियंता संतोष चव्हाण, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, आमदार संग्राम थोपटे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव सुके, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, कुलदीप कोंडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पंचनाम्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. सनी व विठ्ठल मालुसरे या पितापुत्राचा आणि भावकीतील अमोल मालुसरे व गावातील आनंदा जाधव या चौघांचा जागीच मृत्यु झाल्यामुळे निगडे गावावर शोककळा पसरली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

