✒️वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव येथे हा अपघात झाला. या अपघातात पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा या भीषण अपघात मृत्यू झाला आहे. नितीन दिलीप शिंदे वय 36 वर्ष असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात आणि पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, हडपसर येथील पोलिस स्टेशन येथे कार्यरत नितीन शिंदे हे सोलापूर येथून पुण्याकडे यायला निघाले होते. यावेळी ते ज्या बसमधून प्रवास करत होते त्या बसचा अचानक टायर फुटला आणि बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात शिंदे यांच्यासह इतर चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिंदे हे कुटुंबातील कर्ते होते त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि संस्कृती व गिरीजा या मुली असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.