✒️ रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई:- पालघर येथून गणपती विसर्जनाच्या वेळी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पालघरमध्ये एका महिला पोलिस अधिकाऱ्याला दोन भावांना मारहाण केली आहे. हे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. आरोपींनी केवळ महिला पोलिसालाच नाही तर तिच्यासोबत असलेल्या पुरुष पोलिसालाही मारहाण केली. या घटनेनंतर आरोपी भावांना पोलिसांनी अटक केली आहे. विकास अशोक बल्लाळ आणि संदीप बल्लाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यातील बोईसर येथे मंगळवारी रात्री 11.45 च्या सुमारास गणेश विसर्जनाच्या वेळी ही घटना घडल्याचे पोलिस प्रवक्ते सचिन नावडकर यांनी सांगितले.
काल रात्री पासून सर्वत्र गणेशमूर्ती विसर्जन सुरू आहे त्यात पालघर येथील गणेश विसर्जन स्थळी एका वृद्ध जोडप्यासह अन्य काही लोकांमध्ये खाद्यपदार्थ विकण्यावरून वाद सुरू होता. तो वाद मिटवण्यासाठी महिला पोलिस उपनिरीक्षक व काही होमगार्ड कर्मचारी गेले होते. यादरम्यान आरोपींनी महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण इतके वाढले की हाणामारी झाली. एवढेच नाही तर महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या मदतीसाठी आलेल्या पीएसआय शरद सुरळकर यांनाही शिवीगाळ सुरू केली. यावेळी आरोपींनी शरद सुरळकर यांना जमिनीवर आपटले. तसेच त्यांना लाथेने मारण्यास सुरुवात केली.
यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोन भावांना अटक करण्यात आली, तर आई आणि बहिणीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याशी संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांनी अद्याप दोन्ही महिलांना अटक केली नसून पुढील तपास सुरू केला आहे.