✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून ही कोंडी फोडण्यासाठी मुख्य उड्डाण पुलास काही ठिकाणी समांतर छोटे उड्डाण पूल निर्माण करण्याचा सल्ला देतानाच उड्डाणपुलामुळे वाहतूक सुलभ होऊ शकेल असा विश्वास नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक शहरातील वाहतूक सुलभ व सुरळीत होणे करता पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व महामार्ग प्राधिकरण यांचे संयुक्त बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीला अमोल तांबे उपायुक्त श्रीमती पौर्णिमे चौगुले उपायुक्त वाहतूक यांनी नाशिक शहरातील वाहतुकीच्या समस्या उपाय याबाबत व मुख्यत्वे करून द्वारका मुंबई नाका व इंदिरा नगर बोगदा या ठिकाणांवरील वाहतूक समस्या कशा दूर होतील याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मुख्य उड्डाण पुलास काही ठिकाणी समांतर छोटे उड्डाणपूल निर्माण केल्याने वाहतूक सुलभतेस कशी मदत होईल. याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच मुंबई नाका येथील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मुंबई नाका सर्कलची रुंदी कमी करणे व त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत यापूर्वी दिलेल्या प्रस्तावावर जलद कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महानगरपालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी उडणपलावरून व महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमुळे पावसाचे पाणी व चिखल सतत वाहून रस्त्यावर येतो. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाण यात वाढ झाल्याचे सांगितले. त्यामुळेच महामार्ग प्राधिकरण यांनी त्वरित यावर उपाययोजना करावी, याबाबत सूचना दिल्या. तसेच सध्या असलेले चालू असलेले रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे कार्य हे पाऊस ओसरल्यानंतर अधिक जलद गतीने होईल, असेही सांगितले.
नाशिक पोलीस, नाशिक महानगरपालिका व महामार्ग प्राधिकरण यांनी एक समिती गठीत करून वाहतूक नियोजनाबाबत प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घेण्याचे ठरले. बैठकीनंतर पोलीस आयुक्त, नाशिक शहर महानगरपालिका आयुक्त यांनी इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका सर्कल व द्वारका येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नाशिक वाहतूक सुरळीत करण्याकरता प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची बैठक होऊन नाशिक वाहतूक सुलभतेकरता नियोजनात्मक पावले उचलण्यात येत आहेत.
वाहतूक कोंडी नित्याची
दरम्यान नाशिक शहरात लोकसंख्या वाढत असून दिवसेदिवस शहरातील वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्येचा सामना करावा लागत आहे. यासाठी ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा, वाहतूक बेटे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र वाहतूक कोंडी सुटण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे चित्र आहे. दरम्यान पहिल्यांदा नाशिक शहरातील तीन महत्वाचे विभाग एकत्र येऊन यावर तोडगा काढत असल्याने नाशिककरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

