🖋️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक : घरी खेळण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलगी व तिच्या मैत्रिणीसमोर अश्लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.
याबाबत डिसेंबर २०१९ मध्ये इंदिरानगर पोलिसांत पोक्सोअन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. माणिक चोखाजी खिल्लारे वय ३७, रा. इंदिरानगरअसे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० डिसेंबर २०१९ ला सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची अल्पवयीन मुलगी खेळण्यासाठी आरोपी खिल्लारे याच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपी खिल्लारे याने अल्पवयीन मुलीसमोर अश्लील चाळे केले. पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या मैत्रिणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात पोक्सोअन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन खिल्लारे यास अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण बाकले यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष पोक्सो न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायधीश डी. डी. देशमुख यांच्यासमोर झाली.
सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी सात साक्षीदार तपासले. यात पुराव्यानिशी आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी खिल्लारे यास तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. पोलिस नाईक एस. एस. गायकवाड, संतोष गोसावी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

