नितेश पत्रकार यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील प्रशासकिय इमारतीत असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षाचा कांत्राटाचे बिल मिळत नसल्याने विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली आहे. अश्वजीत शेळके, असे विष प्राशन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अश्वजीत शेळके हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा जिल्हाध्यक्ष आहेत. पुरवठा विभागाने गोदाम हमाल कंत्राटदाराचे 2 महिन्यांचे जवळपास 6.50 लाख रुपयांचे देयक दिले नसल्याचा आरोप करत अश्वजीत शेळके यांनी हे खळबळजनक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.
शासकीय धान्य गोदामातील हमालीचा कंत्राट देवानंद शेळके यांच्याकडे आहे. त्यांना नोव्हेंबर 2023 पासून हे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र त्यांनी बोगस कागदपत्रे जोडून कंत्राट घेतल्याची तक्रार प्रशासनाकडे आली. त्यात तथ्य आढळल्यानंतर हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. देवानंद शेळके यांचे सप्टेंबर ते ऑक्टोबरमधील देयक पुरवठा अधिकार्यांकडे प्रलंबित आहे. सोमवारी देवानंद शेळके यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. पवार यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, ही सुनावणी पूर्ण होताच प्रलंबित देयक काढण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे सांगितले. या चर्चेनंतर देवानंद शेळके पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षातून बाहेर गेले.
त्यानंतर काही वेळात ते आपल्या दोन मुलांसह पुन्हा कार्यालयात आले. यावेळी काही अभ्यागत कक्षात बसून होते. या ठिकाणी देवानंद शेळके यांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी देयकावरून वाद घातला. यावेळी उपस्थित असलेल्या त्यांचा मुलगा अश्वजीत शेळके याने देयक न काढल्यास विष प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली.
पुरवठा अधिकारी पवार हे त्याला समजावत असतानाच त्याने खिशातून विषाची बाटली काढून विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कक्षात बसून असलेल्या दिगंबर पाटील व पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी शेळके यांना अडविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत बाटलीतील विष पवार यांच्या शर्टवर आणि कक्षातही संडले. घटनेनंतर शेळके यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पुरवठा विभागात धाव घेत तपासणी केली.
या कांत्राटानंतर आम्ही मजुरांचे संपूर्ण पैसे दिले आहेत. मात्र आमचे देयक काढण्यासाठी पुरवठा विभागाकडून प्रचंड त्रास होत असल्याने आपल्या भावाने वैतागून विष प्राशन केले, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर अश्वजीत याचा भाऊ आशीष शेळके यांनी दिली आहे.

