प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात शासकीय आरोग्य व्यवस्था बिमार अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धा जिल्हा रुग्णालय फक्त जिल्हा रुग्णालय म्हणायला आहे. उपचारात मात्र हलगर्जी सुरू असल्याची घटना समोर आली आहे.
वर्धा शहराचा जवळ दोन मोठे रुग्णालय आहे. त्यामुळे शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचार्यांवर कामाचा ताण कमी आहे. तरी पण रुग्णाला रात्री बेरात्रीही येथील डॉक्टर योग्य सेवा देत नसल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एक अपघातग्रस्त रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आला असता त्याला मलमपट्टी करून टाके लावायला उद्या या, असा सल्ला देऊन परत पाठवण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा शहरातील जय महाकाली शिक्षण संस्थेमध्ये चौकीदार असलेल्या व्यक्तीचा रात्री अपघात झाला. त्यानंतर त्याला रात्री 2.00 वाजता वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी रुग्णालयात हजर असलेल्या डॉक्टरांनी सुरुवातीला रक्तबंबाळ असलेल्या रुग्णाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रुग्णासोबत आलेल्यांनी डॉक्टरला गयावया केल्यानंतर काही वेळाने डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करून मलमपट्टी करून दिली. जखम मोठी असल्याने टाके लावावे लागतील असे सांगितले. परंतु, कोणतेही कारण न सांगता उद्या येण्याचे सांगून रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातून परत पाठवण्यात आले. आज 1 रोजी सकाळी रुग्णाने खाजगी रुग्णालयात जाऊन टाके लावून घेतले.
जिल्हातील इतके मोठे शासकीय रुग्णालयात अशा प्रकारे रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. आपत्कालीन आरोग्य व्यवस्था बिमार असेल तर सर्व सामान्य रुग्णाचे काय हाल होत असेल हे यावरून लक्षात येते. त्यामुळे शासनाने या कडे लक्ष देऊन शासकीय रुग्णालयात उपचार चांगले आणि वेळेवर मिळावे यासाठी पाऊले उचलली पाहिजे असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

