कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला: आमदार डॉ. आशिष देशमुख
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १७:- सावनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची शेती करतात. येथे हजारो क्विंटल कापूस होतो. परंतु येथे शासनाचे सीसीआय केंद्र सुरू नसल्याने नाईलाजाने दलालांना कमी भावाने कापूस विकावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती. संपूर्ण शेतकरी त्रस्त होते. अनेक शेतकऱ्यांनी क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्याकडे सीसीआय केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर आमदार डॉ आशिष देशमुख यांनी तात्काळ कारवाई केली आणि शासनदरबारी योग्य पाठपुरावा करून सावनेरला सीसीआय केंद्र सुरू करून दिले.
या महत्त्वाच्या कामामुळे संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी स्वतः सीसीआय कापूस खरेदी केंद्राला भेट दिली. भेटीदरम्यान संपूर्ण सीसीआय केंद्राची पाहणी केली व उपस्थितांना योग्य निर्देश दिले. तिथे आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, यापुढे आता शेतकऱ्यांना योग्य भावात आपला कापूस विकता येणार आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव झटत राहणार.

