अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 16 जानेवारी रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगणघाट आगारात “इंधन बचत मासिक कार्यक्रम – 2025” कालावधी दिनांक 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 अभियानाचे उद्घाटन शहेमंत जिवतोडे अधिव्याख्याता शासकीय तांत्रिक विद्यालय हिंगणघाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी गौतम शेंडे आगार व्यवस्थापक हिंगणघाट हे होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देवानंद पुन्नमवार पालक अधिकारी तथा विभागीय कर्मवर्ग अधिकारी वर्धा, मनोहर वाणे वाहतूक निरीक्षक हिंगणघाट हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन व मोहिमेच्या फलकाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. नंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उद्घाटक हेमंत जीवतोडे यांनी वाहनाचे दैनिक आणि दशक देखभाल तपासणी योग्य पद्धतीने करून एअर फिल्टर साफ करणे, इंजिनचे टॉपेट तपासणे, ऑईल आणि डिझेल गळती बंद करणे, ई. कामे यांत्रिकांनी वेळेत करूनच दोषमुक्त वाहन मार्गावर दिल्यास इंधन बचत होऊ शकते, असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी देवानंद पून्नमवार यांनी यांत्रिकांनी आपले काम मन लावून करून वेळेवर वाहने नियताला उपलब्ध करून द्यावे. कामात हयगय करू नये. यामुळे रा.प.चे उत्पन्न वाढून खर्चात बचत होईल असे उपस्थित चालक वाहक आणि यांत्रिक यांना इंधन बचतीचे महत्त्व सांगितले.
यावेळी प्रास्ताविक मध्ये हितेंद्र हेमके यांनी चालकाने प्रत्येक वाहनांचे दररोज किमान ०१ लिटर डिझेल वाचवून आगाराचे दररोज ५५ लिटर डिझेल वाचवू शकतो. यामुळे महिन्याला १६५० लिटर ची बचत करून १.५० लाखाची बचत आपण करू शकतो, असे आवाहन केले. तसेच रस्ता सुरक्षिततेबाबत सुद्धा पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. सरते शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम शेंडे आगार व्यवस्थापक हिंगणघाट यांचे अध्यक्षीय भाषण झाले. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, माहे डिसेंबर २०२४ मध्ये रा.प. हिंगणघाट आगार ने जवळपास ५.७० लाखाची डिझेल बचत केली असल्याने हिंगणघाट आगार वर्धा विभागात प्रथम क्रमांकावर नफ्यात आला. दुसरा क्रमांक आर्वी आगाराने पटकावला असून यामुळेच वर्धा विभाग सुद्धा ६.६६ लाखाने नफ्यात आले आहे. इंधन बचत करून आपण खर्चात कपात करून आगाराला व राज्य परिवहन महामंडळाला गतवैभव मिळवून देऊ शकतो. आपण फक्त इंधन, वीज, घरगुती गॅस बचत हे पुढच्या पिढीसाठी करून देशहिताचे काम करू, असे आवाहन उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हितेंद्र हेमके सहायक कारागीर यांनी केले. आभार प्रदर्शन मयूर काठोळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद आसिफ वाहतूक नियंत्रक यांनी केले. या कार्यक्रम वेळी आगारातील अधिकारी, पर्यवेक्षक, प्रशासकीय कर्मचारी, चालक- वाहक, यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

