आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आह. येथे मंगळवारी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास ‘नो पार्किंग’ मध्ये लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना अटकाव करीत त्यांना दोन तरुणींनी चपलेने मारहाण केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार आजिनाथ आघाव यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार आजिनाथ आघाव आणि त्यांचे पोलीस सहकारी ‘नो पार्किंग’ मध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करीत होते. यावेळी आरोपी तरूणीने गाडीतळ परिसरात नो पार्किंगमध्ये दुचाकी MH 24 BQ 7530 लावलेली होती. या दुचाकीवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी आरोपी तरुणीची दुचाकी उचलून पोलीस कर्मचारी टोईंग व्हॅनमध्ये ठेवत होते. त्या वेळी या आरोपी तरुणींनी पोलीस कारवाईला विरोध केला. तसेच, हवालदार आघाव यांच्याशी वाद घालत कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला.
आरोपी महिलांनी हवालदार आजिनाथ आघाव यांना चपलेने मारहाण करुन धक्काबुक्की केली. त्यांनी आघाव यांना धमकावले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख करत आहेत.

