आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक 26 जानेवारी रोजी नगर परिषद राजुरा तर्फे आयोजित मालमत्ता कर व पाणी पट्टी कर लक्की ड्रॉ स्पर्धेचे नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात सोडत व बक्षीस वितरण समारंभ राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे, नगर परिषद राजुराचे प्रशासक डॉ. ओमप्रकाश गोंड, नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी सागर मुळीक तसेच राजुरा शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व अत्यंत उत्कंठावर्धक वातावरणात पार पडला.
प्रथमच महाराष्ट्रात अशा अनोख्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लक्की ड्रॉ स्पर्धेमधे टेलीविजन, रेफ्रीजरेटर, मोबाईल फोन, एअर कुलर, वाटर प्यूरीफायर, मिक्सर ग्राईडर, स्मार्ट वॉच, हेडफोन, पैठणी अशी एकूण 10 बक्षिसे ठेवण्यात आली होती. यात प्रथम पारितोषिक मनोहर पांडुरंग पिंपळकर, द्वीतिय पारितोषिक हर्षल बेतावर, तृतीय पारितोषिक जेठाराम जाठ, चतुर्थ पारितोषिक तानेबाई डाहुले, पाचवे पारितोषिक गिरी गोप, सहावे पारितोषिक सुशीला खोबरे, सातवे पारितोषिक उषा नांदे, आठवे पारितोषिक चंद्रकला वरवाडे, नववे पारितोषिक राजु जुलमे, दहावे पारितोषिक नवनाथ खंडाळे यांना मिळाले. तसेच नगर परिषदेतर्फे सात प्रोत्साहनपर बक्षिस सुद्धा देण्यात आले.
या प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी उपस्थित जनतेला संबोधित करून मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रम मोठया उत्साहात व यशस्वी पार पडल्याबद्दल नगर परिषद राजुराचे प्रशासक ओमप्रकाश गोंड यांनी नगर परिषद राजुराचे सर्व वसुली पथक, सर्व अधिकारी व सर्व कर्मचाऱ्याचे कौतुक केले.
या लकी ड्रॉ स्पर्धेचा परिणाम म्हणून १ एप्रिल ते २३ जानेवारी या कालावधीत एकूण रु.१.६९ करोड म्हणजेच ४८.७०% (निव्वळ मालमत्ता कर ५६.९०%) एवढी वसुली झाली. तसेच १ डिसेंबर ते २३ जानेवारी या ५४ दिवसांच्या कालावधीत १.०८ करोड म्हणजेच एकूण जमा कराच्या ६४% एवढी कर वसुली झाली. राजुरा नगर परिषदेच्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी विक्रमी कर वसुली झाल्याचे बोलले जात आहे. या स्पर्धेला राजुरा वासियांनी अतिशय उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल राजुरा नगर परिषदचे मुख्याधिकारी सागर मुळीक यांनी जनतेचे आभार मानले व इथून पुढे देखील याच प्रकारे सर्व प्रकारच्या करांचा भरणा करून राजुरा शहराच्या विकासास हातभार लावण्याचे आवाहन केले.

