नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- राज्यात महिला मुलीवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यात आता चिमुकल्या मुलीही त्याला बळी पडत आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील दिग्रस येथील शाळेत मुख्याध्यापकाने चिमुकल्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची घटनेने खळबळ माजली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकाने विकृत कृत्य केल्याने संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त करण्यात येतोय. विशाल विजयकुमार कुळकर्णी वय 43 वर्ष, रा. कृष्णभूमी, दिग्रस असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे.
कार्यालयात बोलवून मुख्याध्यापकाचे अश्लील कृत्य: मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस येथील शाळेत केजीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीवर मुख्याध्यापकानेच अत्याचार केला. ही विद्यार्थीनी केजी 2 ला शिकते. मुख्याध्यापक विद्यार्थिनीचा काही दिवसांपासून दररोजच लैंगिक छळ करत होता. जेवणाची सुट्टी झाल्यानंतर तो या चिमुकलीला बोलवून अश्लील चाळे करत होता. मुख्याध्यापकाच्या या वर्तणामुळे विद्यार्थीनी घाबरली होती. तिने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने हे सर्व तिच्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठत मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केली. पोलीसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ मुख्याध्यापकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली. या घटनेचा पुढील तपास दिग्रस पोलीस करत आहे.

