रवींद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 25 वर्षीय उच्चशिक्षित तरूणीने शासकीय नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राणी साहेबराव नाईकवाडे राह. खादगाव, हल्ली मुक्काम गणेशनगर, बदनापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नसल्यामुळे नोकऱ्या मिळत नसल्याने समाजातील उच्चशिक्षित तरुण आणि तरुणी टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यात गळफास घेऊन आत्महत्या करणारी राणी नाईकवाडे ही विज्ञान शाखेची पदवीधर होती. ती मागील अनेक दिवसापासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक परीक्षांनाही सामोरे गेली होती. उच्च शिक्षित असून देखील केवळ आरक्षण नसल्याने शासकीय नोकरी मिळत नाही. या विवंचनेत तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मुलीचे नातेवाईक खादगाव ता. बदनापूर येथील सरपंच सोपान नाईकवाडे यांनी दिली आहे.
मृतक राणी नाईकवाडे हिने आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तिच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा मोठा परिवार असून तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.

