मंगेश जगताप मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबई येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरात एका मोकळ्या ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेवर हमाली काम करणाऱ्या एका नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. एका महिलेवर अशा प्रकारे रेल्वेत अत्याचार झाल्याने रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा प्लॅटफॉर्मवरील सुरक्षादल कुठे गेले होते? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
एक 55 वर्षीय महिला ट्रेननं हरिद्वार या ठिकाणाहून मुंबईत आपल्या एका नातेवाईकासोबत फिरायला आली होती. यावेळी ती रेल्वेत झोपली असताना हमालाने संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नराधम हमालाला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, 55 वर्ष पीडित महिला आपल्या एका नातेवाईकासह मुंबई फिरायला आली होती. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने दोघांनी वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला दोघंही प्लॅटफॉर्मवर झोपले होते. त्यानंतर पीडित महिलेचा नातेवाईक काही कामासाठी तिथून बाहेर गेला. तेव्हा प्लॅटफॉर्मवर एकटीच महिला झोपली होती.
त्यानंतर महिलेला जास्त झोप येत असल्याने तिने बाजुलाच उभ्या असलेल्या मोकळ्या ट्रेनमध्ये झोपायला गेली. तेव्हा ट्रेनमध्ये तिथे कुणीच नव्हतं. दरम्यान, टर्मिनसवरील आरोपी हमालाने महिलेला ट्रेनमध्ये घुसताना पाहिलं. महिलेला डोळा लागताच आरोपी हमालही ट्रेनमध्ये घुसला. तिला एकटीला पाहून आरोपीनं तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
थोड्या वेळानंतर पीडित महिलेचा नातेवाईक घटनास्थळी आला, तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकाला सांगितला. यानंतर दोघांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला, महिलेसोबत घडलेली आपबिती सांगितली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे तपासून नराधम हमाल आरोपीची ओळख पटवली आणि त्याला तत्काळ अटक केली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच या गुन्ह्यात इतरही कुणाचा सहभाग आहे का? त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.

