उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका 4 वर्षीय चिमुकल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. संशयित आरोपी पांडुरंग सोमनिंग कळळी वय 45 वर्ष याला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्यात महिला मुलीवर अत्याचार व लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. आता, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चिमुकल्या मुलीवर अत्याचार करुन तिचा मृतदेह घरातील पेटीमध्ये लपवून ठेवला होता. याप्रकरणी, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, करजगी येथे 4 वर्षांची चिमुकली आपल्या आजी- आजोबा सह राहत होती, तर तिचे आई – वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत. घराशेजारीच पांडुरंग कळळी हा आईसह राहत होता. तो मजुरी करत होता. त्याच्या घरासमोरच बदामाचे झाड आहे. गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास बालिका खेळत-खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगच्या घरासमोर आली. तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले. त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला. त्याठिकाणी कोणी नसल्याचे पाहून पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून खून केला. खुनानंतर कोणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला.
दरम्यान, नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली. चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली. तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचे निदर्शनास आले. त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगितले.
या चिमुकलीची हत्या बलात्कार करून झाल्याचा दाट संशय असून शविच्छेदन अहवालनंतर ते स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळळी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयित आरोपी पांडुरंग कळळी हा संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्याच्यावर संशय बळवल्याने त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरातील एका पत्र्याच्या पेटीमध्ये मृतावस्थेत संबंधित बालिका मिळून आली. पोलिसांनी पांडुरंग कळळी-पुजारी याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बालिकेचा खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, या घटनेनंतर गावातील नागरिकांकडून संपात व्यक्त होत असून बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

