विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च टाळा – माजी खासदार रामदास तडस यांचे आवाहन.
गुंफण या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन.
मेळाव्यात समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संताजी जनसेवा मंडळ हिंगणघाटच्या वतीने सर्व शाखीय तेली समाज वधू वर व पालक परिचय मेळावा स्थानिक कलोडे सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार रामदास तडस, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा होते. या मेळाव्याचे उद्घाटन डॉ. भूषण कर्डिले, महासचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांचे हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता धर्मराज रेवतकर, अ.भा. तैलिक महासभा महाराष्ट्र गोवा राज्य , अतुल वांदिले युवा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभा, ज्येष्ठ समाजसेवी नानाजी गंधारे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, पंढरीनाथ कापसे, मिलिंद भेंडे, वामनराव खोडे, संयोजक चंद्रकांत वाढई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून झाली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘ गुंफण ‘ या वधू-वर व पालक परिचय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात डॉ.कर्डिले म्हणाले की समाज बांधवांनी लाचार होऊन राजकीय नेत्यांच्या मागे न जाता स्वाभिमानाने जगावे. असे आवाहन केले. महाराष्ट्रात समाज बांधवांची संख्या मोठी असून सुद्धा राज्याच्या राजकारणात मात्र नाममात्र अस्तित्व आहे. अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी खासदार वाघमारे यांनी समाजातील दुर्बल घटकांची उन्नती करण्यासाठी सधन व्यक्तींनी हातभार लावणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले. वांदिले यांनी आर्थिक व सामाजिक दृष्ट्या समाज प्रगतीपथावर आहे, परंतु राजकीय दृष्ट्या मात्र अद्यापही मागे आहे. अशी खंत व्यक्त केली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी खासदार तडस म्हणाले की आधुनिक काळात विवाह प्रसंगी वारेमाप खर्च करून जणू स्पर्धाच सुरू असल्याचे दिसत आहे. यात मात्र मध्यमवर्गीय व सर्व सामान्य कुटुंबांची मात्र गळचेपी होत आहे. त्यामुळे विवाह सोहळात होणारा अनावश्यक खर्च टाळावा असे आवाहन केले. सदर मेळाव्यात सुमारे ४०० पेक्षा अधिक उपवर वधूंनी नोंदणी करून व्यासपीठा वरून परिचय दिला.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपवर वधू पालक व समाज बांधवांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. संदीप रेवतकर तर संचालन प्रा. किरण वैद्य यांनी केले. उपस्थितांचे आभार माधुरी विहीरकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजना करीता समाज बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

