आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- बिल्डरने एक फ्लॅट अनेक नागरिकांना विकण्याच्या घटना कमी नाही आहे. त्यात पुण्यातून एक अशीच घटना समोर आली आहे. त्यात फ्लॅट विकत घेणाऱ्या ग्राहकाला मारहाण करून जातीवाचक शिवगाळ केल्याने बिल्डर सह त्याच्या 7 साथीदारावर अॅट्रोसिटी व फसवणुकीचा गुन्हा सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सिद्धी समृद्धी डेव्हलपर्सचे भागीदार संपत दत्तात्रय चरवड, स्वप्नील रमेश चरवड, गौरव सुरेश चरवड रा. वडगाव बुद्रुक, सचिन सुदाम बेलदरे, सुदाम पांडुरंग बेलदरे, मंगेश बेलदरे तिघे रा. आंबेगाव बुद्रुक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत बिबवेवाडी येथील एका महिलेने सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. सिद्धी समृद्धी डेव्हलपर्सचे संचालक याने एक फ्लॅट 2022 मध्ये विकला असताना तोच फ्लॅट परत 2023 मध्ये दुसर्या व्यक्तीला विकला. त्यांनी फ्लॅटचा ताबा देण्याची मागणी केल्यावर त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सचिन सुदाम बेलदरे यांच्यासह 7 जणांविरुद्ध अॅट्रोसिटी व फसवणुकीचा गुन्हा सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे. आरोपींना याबाबत 41 नुसार नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सुखसागर येथे व्यवसाय आहे. त्यांना सचिन बेलदरे हे वडगाव येथे सिद्धी क्लासिक हा गृहप्रकल्प करत असल्याचे समजले. त्यांनी सिद्धी क्लासिकमध्ये फ्लॅट क्रमांक 101 पसंत करुन त्यासाठी 13 लाख रुपये सचिन बेलदरे यांना दिले. फ्लॅटचे मुख्यत्यारपत्र नोंदणी करुन बेलदरे यांनी फिर्यादी यांना दिले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी फ्लॅटचा ताबा मागितल्यावर सचिन बेलदरे यांनी ताबा देण्यास टाळाटाळ केली. तेव्हा फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी सिद्धी क्लासिक इमारतीत जाऊन पाहणी केल्यावर तेथे भाडेकरु रहात असल्याचे दिसले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांना जयदीप चरवड यांनी भाड्याने ठेवले असल्याचे भाडेकरुंनी सांगितले. त्याचवेळी तेथे सचिन बेलदरे, मंगेश बेलदरे, स्वप्नील चरवड त्या ठिकाणी आले. तेव्हा फिर्यादी यांनी आम्हाला दिलेल्या फ्लॅटमध्ये हे दुसरे लोक कोण ठेवले आहेत, असे विचारले. त्यावर सचिन बेलदरे याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत तो म्हणाला की, निघ येथून, तुझी लायकी आहे का फ्लॅट घेण्याची. त्यावर मंगेश बेलदरे याने याची लायकी आपल्या पायाजवळ राहण्याची आहे. पायातील चप्पल पायात ठेवावी लागते, असे बोलून त्यांना हाकलून दिले. ते पैसे मागण्यासाठी सचिन बेलदरे यांच्या कार्यालयात गेले असताना त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत फिर्यादी यांनी चौकशी केल्यावर त्यांच्याशी करार करुन कुलमुख्यत्यार पत्र देण्याअगोदर बेलदरे यांनी हा फ्लॅट 2022 मध्ये दुसर्या व्यक्तीला विकला होता. तरीही फिर्यादी यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कुलमुख्यत्यार पत्र नोंदणी करुन फसवणुक केली व जातीवाचक शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त अजय परमार तपास करीत आहेत.

