वाळू घाटाचे लिलाव करून ‘वाळू डेपो’ बंद करावे: माजी आमदार राजू तिमांडे.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट १३ फेब्रु:- वाळू घाटाचे लिलाव करून ‘वाळू डेपो’ बंद करण्यात यावे अशी निवेदनाद्वारे मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने वाळू डेपोचे नवीन धोरण सुरू केले आहे. परंतु वाळू डेपोच्या नावावर सर्रास वाळू चोरीचे प्रकार सुरू असुन सरकारचा करोडो रुपयाचा महसूल चोरला जात आहे तसेच सरकारच्या ठरल्या दराच्या जास्ती पैशाने अनधिकृत रित्या रेती विक्री करत आहे.या सर्व प्रकरणात रेतीची तस्करी केल्या जात असून सरकारचे प्रशासकीय अधिकारी व रेती माफियांच्या संगनमताने शासनाची लक्तरे वेशीवर टांगल्या जात आहे.
वाळू घाटाचे लिलाव झालेले नसुन वाळू डेपोच्या माध्यमातून सरकारचा करोडो रूपयाचा महसूल चोरल्या जात असून त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हात ओले झाले आहे. शासनाच्या महसूल विभागाचे रेती चोरीस होणारे ‘अर्थपूर्ण’ संगनमत रेती माफिया सोबत आहे.
वर्धा जिल्ह्यातील शेकापुर (बाई) शेकापुर येळी, सोनेगांव कुटकी, दारोडा, टाकळी (दरणे) आजनसरा, पोहणा, येरला, हिवरा, मांडगाव, शेडगांव, साकुली, कापसी, कान्होली, कात्री, इत्यादी घाटातून रेती चोरीचे सर्व प्रकार उघडपणे सुरू असून त्यात महसूल विभागाची यंत्रणा वसूली करीत आहे. वर्धा, वणा, यशोदा, इत्यादी नदीचे प्रवाह वेगवेगळ्या गावात आहे. नदीच्या पात्रातून मागील दोन वर्षापासून वाळू डेपो सुरू केली असून वाळू घाटांचे लिलाव केले आहे. जानेवारी-फेब्रुवारी ते पावसाळा सुरुवाती पर्यंत वाळू चा उपसा होतो. वाळू डेपो चा उपसा दाखवून आड-मार्गाने वाळू माफिया कडून वाळूची चोरी घाटातून दुसऱ्या मार्गाने केली जाते. मागील दोन वर्षापासून उपसा केलेली वाळू देपोतून देण्याचे धोरण सरकारने अवलंबविले होते. पण त्यात वाळू चोरीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून अधिकारी व रेती माफिया यांची सांगड निर्माण झाली आहे.
तरी सरकारने वाळू घाटाचे लिलाव त्वरित करून वाळू डेपो बंद करण्यात यावे व हा संपूर्ण भोंगळ कारभार बंद करावा अशी मागणी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.

