आमदार डॉ आशिष देशमुख यांनी जमीन अधिग्रहित शेतकऱ्यांना न्याय देण्याची केली मागणी. डब्लूसीएल च्या सीएमडीने 30 दिवसात तोडगा काढण्याचे दिले आश्वासन.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेर परिसरातील कोठोडी येथे, डब्ल्यूसीएल च्या विरोधात पिडीत शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. या भेटीत त्यांनी 10 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या बेमुदत आंदोलनाबद्दल सविस्तर चर्चा केली. सावनेरचे भाजपाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी याप्रसंगी डब्लूसीएल पिडीत शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली तसेच या आंदोलनावर तोडगा काढून पिडीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
सावनेर परिसरातील पटकाखेडी, कोठोडी, आदासा व येरणगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वेस्टर्न कोल्ड फिल्डने ओपन कास्ट खदान सुरू करण्यासाठी 2021 मध्ये अधिग्रहित केल्या. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असताना अद्यापही त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित केली नाही. तसेच पीडित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. हे बेमुदत आंदोलन आता चिघळत चालले आहे. त्यामुळे वेळीच तोडगा काढण्याची नितांत गरज आहे. गावांचे लवकर पुनर्वसन करण्यात यावे, चुकीच्या पद्धतीने झालेली मोजणी पुन्हा करावी, प्रत्येक घरमालकाला योग्य मोबदला मिळावा, शेतकऱ्याला न्यायालयाने दिलेल्या धोरणानुसार तीन महिन्याच्या आत नोकरी द्यावी, पुनर्वसन होईस्तोवर पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे, आंगेवाडा येथील 30 हेक्टर बाधीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या महत्त्वाच्या सहा मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या रास्त असल्याने डब्ल्यूसीएलने त्या त्वरित मार्गी लावाव्यात आणि त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती डॉ.आशिष देशमुख यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर, डब्ल्यूसीएलचे सीएमडी द्विवेदी व इतर अधिकारी उपस्थित होते.
महिन्याभरात पिडीत शेतकऱ्यांच्या समस्येवर समाधानकारक तोडगा काढून योग्य आदेश काढावा, असे निर्देश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डब्लूसीएलच्या अधिकाऱ्यांना दिले. एका महिन्यात या समस्येवर तोडगा काढू, असे आश्वासन डब्लूसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिले. लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे कोयला खदान पिडीत शेतकरी समितीच्या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, आमदार डॉ आशिष देशमुख यांनी केंद्रीय कोळसामंत्री जी किशन रेड्डी व डब्ल्यूसीएलचे सीएमडी यांची डब्लूसीएल नागपूर येथे 13 फेब्रुवारी 2025 ला भेट घेऊन या बाबतीत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यासंबंधी एक निवेदन पत्र सुद्धा त्यांना दिले होते. श्री जी किशन रेड्डी यांनी याबाबतीत जातीने लक्ष घालून तोडगा काढू, असे आश्वासन डब्ल्यूसीएलचे सीएमडी व अधिकाऱ्यांच्या समक्ष आमदार डॉ आशिषराव देशमुख यांना दिले होते.
“जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरूच राहील. घरांना योग्य मोबदला, पिण्याच्या पाण्याची सोय, नवीन घरात पुनर्वसनाची सोय करावीच लागेल. पुनर्वसनाची प्रक्रिया प्रलंबित होत आहे. साधी जागा देखील डब्लूसीएल फायनल करू शकले नाहीत. हे आंदोलन 20 फेब्रुवारीपासून अधिक तीव्र करू”, असा इशारादेखील आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी 10 फेब्रुवारीला दिला होता, हे विशेष.

