प्रशासनावर नागरिकाचा संताप, आश्वासनानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिगणघाट शहरातील सांडपाणी मागील कित्येक वर्षापासून नदीत मिसळून वणा नदी प्रदूषित होत असल्याने हें सांडपाणी सोडण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी ह्या मागणी साठी वणा नदी संवर्धन समितीद्वारे तिरंगा हातात घेऊन आज दि 21 फेब्रुवारीला वणा नदीच्या पात्रता सांडपाणी घेऊन जाणाऱ्या नाल्यात दोन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या आंदोलनाबाबत प्रशासनाला 20 दिवस आधी कळवून सुद्धा आज आंदोलन स्थळी कोणताही मोठा अधिकारी फिरकला नाही मात्र त्यांनी आपआपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना आंदोलनस्थळी पाठवून वेळ मारून नेली.
आज दुपारी 11 वाजता चटके देणाऱ्या उन्हात वणा नदी संवर्धन समितीचे रुपेश लाजूरकर, सुनील डोंगरे, नितीन क्षीरसागर, दीपक जोशी, गोपाळ मांडवकर, जीवरक्षक राकेश झाडें, सूरज कुबडे, अशोक मोरे यांनी तब्बल दोन तास ह्या घाण पाण्यात उभे राहून आपला तीव्र निषेध नोंदविला. त्यानंतर तहसील कार्यालयाचे ग्रामसेवक आर. बी. घवघवे, नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी विकास धबडगे, पाणी पुरवठा अभियंता अमर लाड यांनी या आंदोलकांच्या स्थळाला भेट दिली. मुख्याधिकारी यांच्या सहीचे पत्र देऊन सोमवार, दि. 24 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता नगर पालिका सभागृहात या विषयावर बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलकानी आपले आंदोलन वापस घेतले.
या आंदोलना विषयी दि 5 फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी व नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन कळविले असतांनाही कोणत्याही वरिष्ठ अधिकारी आज गावात उपलब्ध नव्हता हें विशेष.

