राम मंदिर कमिटीच्या ट्रस्टचे कार्य काय? रामनवमीला जागृत होणारी श्रीराम भक्ती उर्वरित ३६४ दिवस जाते कुठे?
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील राममंदिर वार्ड स्थित शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेले “प्रभू श्रीराम मंदिराला” भेगा पडल्याने शहरातील श्रीरामभक्तांच्या भावना सातत्याने दुखावल्या जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रभू श्रीराम मंदिराची झालेली दुरवस्था यासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न मागच्या कित्येक वर्षांपासून तरी अनुत्तरित असाच आहे. राम मंदिराची झालेली बिकट अवस्था आणि त्यातून दुखावल्या जात असलेल्या भावना याकडे ट्रस्टमधील सदस्य असलेले लक्ष देतील की, आणखी वेळकाढू धोरणच अवलंबून कित्येक वर्षे असेच पुढे ढकलण्यात येईल हे येणारा काळचं सांगेल.
राम मंदिराच्या कळस हा गळून पडण्यावर आलेला आहे, मंदिराचे छत पावसाळ्यात गळते, मंदिरात मूर्तीची देखभाल व पूजा अर्चना करण्यासाठी पुजारी नाहीत, मंदिर परिसरात अस्वच्छता पसरली आहे, पिण्याच्या पाण्याच्या नळा भोवताली चिल्यांचे साम्राज्य पसरले आहे, संरक्षण भिंतीला तडे गेले आहे. मंदिर हे जर्जर झाले आहे. दरवर्षी फक्त राम जन्मोत्सव थाटामाटात करून वर्षभर मात्र इथे ट्रस्टमधील सदस्य असो की, पदाधिकारी असो हे फिरकून सुद्धा बघत नसल्याने हिंदू धर्माच्याया आराध्य दैवताची होत असलेली दुरवस्था न बघण्यासारखी आहे.
राज्य शासनाने तिर्थस्थळाचा दर्जा देऊनही राम मंदिराचे विकासकार्याची कुदळ मारण्याची इच्छाशक्ती जागृत कधी होईल ही बाबच सामान्य भक्तांच्या कळण्या पलीकडची बाब आहे. मंदिर ट्रस्टकडे स्वतःची करोडो रुपयांची संपत्ती असतांना त्या संपत्तीचे मंदिर जीर्णोद्धार निर्माण कार्यासाठी वापर का केला जात नाही? या प्रश्नाचे उत्तर ट्रस्टमधील पदाधिकारी-सदस्य देतील काय? हिंगणघाट शहरात व हिंगणघाट शहराच्या आसपासच्या परिसरात प्रभू श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जमिनी अस्तित्वात आहेत. त्यावर खाजगी लोकांनी अतिक्रमण केले आहेत. अश्याया एक ना अनेक गंभीर गोष्टी या प्रभू श्रीराम मंदिर ट्रस्टशी निगडित असून सुद्धा ट्रस्ट मधील सदस्य बघ्यांची भूमिका का बरं घेत आहे? यावर सुद्धा कित्येक वर्षांपासून प्रश्नचिन्हचं निर्माण झाले आहेत.
खुर्चीला चिटकून राहत फक्त जन्मोत्सव सोहळ्यावर दरवर्षी लाखों रुपयांची उधळपट्टी करायची आणि वर्षभर मात्र फिरकूनही बघायचे नाहीत अश्या प्रकारची वर्तवणूक अतिशय निंदनीय बाब आहेत ही वास्तविकता आहे. मंदिर
जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत कित्येक दशकं लोटून गेली आणि पुढे कित्येक दशकं आणखी लोटून जाईल पण भक्तांच्या नाहक दुखावल्या जाणाऱ्या भावनेला जबाबदार कोण? या अनुत्तरित असलेल्या प्रश्नांचे उत्तरे देईल कोण? की आवाज उचलणाऱ्यांचे आवाज दाबण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि दबावतंत्राचा वापर पुढेही असाच नित्यनेमाने सुरू राहील ही बाब सुद्धा पुढे येणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
हिंगणघाट शहरातील प्रभू श्रीराम भक्तांच्या भावना लक्षात घेता आणि कित्येक वर्षांपासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्याची कुदळ येत्या ६ एप्रिलला “रामनवमीच्या” शुभमुहूर्तावर मारावी आणि ऐतिहासिक कार्याचा शुभारंभ करून नव्या पर्वाची सुरुवात करावी अशी भावना अनेक राम भक्तांनी व्यक्त केली आहे.

