उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे एका पत्नीने आपल्या पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत म्हणून आपल्या मुलगा व त्याच्या मित्रांशी संगनमत करून आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता. बाबूराव दत्तात्रय पाटील वय 54 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी वनिता बाबूराव पाटील वय 40 वर्ष, मुलगा तेजस बाबूराव पाटील वय 26 वर्ष आणि त्याचा मित्र भिमराव गणपत हुलवान वय 30 वर्ष तिघेही राह. शिरढोण ता. कवठेमहांकाळ यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिस स्टेशन मध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास नरसिंहगावच्या हद्दीत हॉटेल आर्याच्या जवळ बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी – नागपूर महामार्गाच्या दुभाजकाच्या नजीक आढळून आला होता. त्यानंतर बाबुराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील याने घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे आणला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. स्वप्नाली पाटील यांनी दिली. यानंतर कवठेमहांकाळ पोलिस स्टेशन मध्ये याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत होते.
या घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत थोडा संशय आला. त्यानंतर त्यांनी सखोल तपास करत अपघाताचा बनाव उघडकीस आणला. शुक्रवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भिमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील नरसिंहगाव गावाचे जवळील मिरज ते पंढरपुर जाणारे हायवे क्रमांक 166 वरील आर्या हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटुन खून केल्याचे कबूल केले.
पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूराव पाटील यांचा मृतदेह सापडलेनंतर केलेल्या चौकशीत पत्नी आणि मुलाने घटना घडली तेव्हा ते कराड येथे असल्याचे सांगितले होते. पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढलेनंतर ही माहिती खोटी असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही. फूटेज तपासले असता काही धागेदोरे सापडले.
यामध्ये पत्नी, मुलगा आणि तिसऱ्या संशयिताचे फूटेज सापडले होते. आणखी चौकशी केली असता पत्नी आणि मुलगा यांच्यावरील संशय बळावला. यानंतर आणखी बरेच धागेदोरे मिळताच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीत उलट तपासणी वेळी या तिघांनी हत्येची कबूली दिली. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

