प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आर्वी येथे महसूल व वनविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या भव्य प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. याचबरोबर यावेळी ७२० कोटीच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
आर्वी तालुका आणि संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वाचा मार्ग ठरला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जलसंपदा, रस्ते विकास, ग्रामीण पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शैक्षणिक वसाहती, शासकीय इमारती आणि नागरी विकास यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये भविष्यात नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. ‘विकास हीच दिशा’ या मंत्राला अनुसरून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आर्वी तालुक्यातील योजनांना मंजुरी देऊन प्रशासनाच्या गतीमान कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात राज्य शासनाच्या संकल्पनांची माहिती दिली आणि आर्वी तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील टप्प्यावर अजून अनेक योजना आणण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे आर्वी तालुक्यातील नागरी सुविधा बळकट होणार असून, रोजगाराच्या संधी वाढतील आणि एक नवा शाश्वत विकासाचा अध्याय सुरू होईल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला. विकासाच्या वाटचालीतील हा ऐतिहासिक क्षण आर्वीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात वर्धा जिल्हा पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, विधान परिषद सदस्य दादाराव केचे, आर्वीचे आमदार सुमित वानखेडे, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच तालुक्यातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

