संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- ईदचा आनंद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा केवळ स्वतःच्या कुटुंबातील लोकच नव्हे तर समाजातील प्रत्येक वर्गाचे आणि धर्माचे लोक देखील त्यात सहभागी होतात. आजच्या काळात, जेव्हा देशात अल्पसंख्याकांबाबत शंका आणि अपप्रचार सामान्य झाले आहेत, तेव्हा परस्पर सहिष्णुता, शांतता आणि बंधुत्वाचा संदेश देणे ही काळाची सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे.
या उद्देशाने राजुरा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व धर्मीय सदभावना ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्याचा उद्देश सर्व धर्म आणि समुदायांसोबत ईदचा आनंद वाटणे, मानवतेला प्रोत्साहन देणे आणि समाजात बंधुत्वाचे वातावरण मजबूत करणे हा होता. या कार्यक्रमाला राजुरा शहरातील विविध धार्मिक समुदायातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या, ज्यात राजुरा नगर पालिकाचे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
ईद मिलन सर्वधर्मीय संमेलनात मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे म्हणाले की, बंधुभाव जपत मुस्लिम समाजाने सर्व धर्म समभावाचे उदाहरण दिले आहे. हेच छत्रपती शिवरायांनी आम्हास शिकवले प्रत्येक धर्माचा आदर करणे हीच भारतीय संस्कृती आहे. भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे, देशातील प्रत्येक नागरिकांनी हिंदू मुस्लिम सर्व धर्माचा आदर करून देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईलच शिवाय, संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रही घडेल. आज देशातील एका मोठ्या वर्गाचे जीवनमान गरीब आफ्रिकन देशांपेक्षा वाईट आहे. त्याला अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांना शोषणाचे बळी व्हावे लागते. मित्रांनो, आज आपण अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे. आर्थिक विषमतेची खोल दरी कमी करूनच राज्यघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
ते पुढे बोलताना म्हणाले की, काही राजकारणी विनाकारण हिंदू मुस्लिम करत समाजात विष पेरण्याचे कार्य करत आहे. पण संविधानाने आपल्या सर्वांना समान संधी अधिकार बहाल केला आहे. त्यामुळे आज सर्व नागरिकांनी इतर जाती धर्माचे नागरिकांशी सलोखा बंधुभाव जपत या भारताला आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्या, तरुणांत वाढलेली बेरोजगारी, महिला अत्याचार, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यावेळी मंचावर मुस्लिम समाजाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

