✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- जिल्हातील राहुरी येथून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. मुळा धरणाच्या मुख्य गेटवर सेवा बजावत असलेले पोलीस हेडकोन्स्टेबल भाऊसाहेब दगडु आघाव वय ५२ वर्षे, राहनार बारागांव नांदुर यांनी आज सकाळी आपल्या कडे असलेल्या सरकारी रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली आहे.
सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
जेथे घटना घडली तेथे एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात अकोले तालुक्यातील राजूर येथे बंदोबस्तासाठी असताना तेथील पोलिसांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याने हतबल झाल्याचं त्यात म्हटलंय.
अतिरिक्त पोलीस निरिक्षक आणि तीन पोलिसांनी संगनमताने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अवैध धंदे बंद केल्याने अतिरिक्त पोलीस निरिक्षक यांनी खोटा गुन्हा दाखल केला. तसेच गुन्हा मागे घेण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आलाय.
घटनेमुळे जिल्हा पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस फौजफाट्या सह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भाऊसाहेब आघाव यांनी चौकीच्या दाराला आतुन कडी लावून आत्महत्या केल्याचे आढळून आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. राहुरी पोलीसांनी पंचा समक्ष चौकीचे दार लाथा मारून तोडून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उतरीय तपासणी साठी राहुरी येथे पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी तातडीने भेट देत माहिती घेतली. राहुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र अश्या घटनेमुळे पोलीस प्रशासनात तसेच एकूणच जिल्हयाभरात एकच खळबळ उडाली आहे.