✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी
मुंबई:- शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना एकीकडे सुरू असताना दुसरीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असाही कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांना जामीन नाकारण्यात आल्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र, यावरूनच शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यासोबतच, चरणसिंग थापा शिंदे गटात आल्यावरून शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे.
दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना गुलाबराव पाटील यांनी धुळ्यात एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेवर आगपाखड केली आहे. बाळासाहेब ठाकरेंची शेवटपर्यंत सेवा करणारे चरणसिंग थापा नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यावरून शिवसेनेनं टीका केल्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी त्यावरून हल्लाबोल केला आहे.
“उद्धव ठाकरेंचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही. हाबू हाबू करून सर्वांना ते पळवत आहेत. ज्यानं बाळासाहेबांची सावलीसारखी सेवा केली, त्या चरणसिंग थापावर तुमचा विश्वास राहिला नाही. गुलाबराव पाटील मंत्रीपदासाठी शिंदे गटात गेला असं म्हणता.मग चरणसिंग थापाला काय एमएलसी व्हायचं होतं का?” असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

