श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- यावर्षी पावसाळ्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड शहराच्या जवळच असलेले बिंदुसरा धरण जवळपास ८० टक्के भरले आहे. पावसाळपूर्वी अतिवृष्टीमुळेच धरण ८० टक्के भरले आहे तर येत्या पावसाळ्यात पावसाची आवक वाढल्यानंतर बिंदुसरा नदीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड शहरातून बिंदुसरा आणि करपरा या दोन नद्या वाहतात. यावर्षी मान्सूनपूर्व अतिवृष्टी जोरदार झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याअगोदरच बीड शहरातील दोन्ही नद्यांना पाणी आले आहे. तसेच बीड शहराला लागून असलेल्या पाली येथील बिंदुसरा धरण प्रकल्पही, जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार ८० टक्के क्षमतेने भरले आहे. मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळेच ८० टक्के भरलेले धरण आगामी पावसाळा काळात होणारा पाऊस आणि पाण्याची आवक यामुळे साहजिकच आणखी जास्त प्रमाणात भरले जाणार आहे. त्यामुळे बीड शहरातून वाहणार्या बिंदुसरा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन पूर परिस्थितीबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
पूल कम बंधाऱ्याच्या कामाची गती वाढविण्याच्या सूचना: बीड शहरातील बार्शी रोडवरील बिंदुसरा नदीपात्रात पूल कम बंधार्याचे काम सुरू आहे. पाणीपातळीत वाढ होण्याअगोदर हे काम ठराविक स्तराच्या पुढे असणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या कामाच्या गती पेक्षा अधिक गतीने हे काम होणे गरजेचे आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी (दि.२९) रोजी सदरील कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गती वाढविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला केल्या.

