पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील आगामी सण उत्सव च्या निमित्ताने तसेच बकरी ईद, संभाजी राजे जयंती, शिवराज्याभिषेक, गुरुगोविंद सिंह जयंती इत्यादी विविध सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शांतता, सौहार्द आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्वपूर्ण शांतता बैठक पोलीस मुख्यालय येथील अलंकार हॉल येथे दि. २/६/२०२५ चे सायं. ५.०० वा ते ६.३० वा दरम्यान आयोजित करण्यात आली. या बैठकीस सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणे प्रभारी, हिंदू-मुस्लिम तसेच इतर धर्मीय समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, शांतता समिती सदस्य, मोहल्ला समिती सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले होते. शहरात सामंजस्याचे आणि सलोख्याचे वातावरण टिकून राहावे, हा या बैठकीचा मुख्य हेतू होता.
या बैठकीमध्ये सर्व पोलीस ठाण्यांमधील शांतता समिती सदस्यांनी सक्रिय उपस्थिती दर्शविली. सर्वप्रथम शांतता समितीच्या या बैठकीसाठी आलेल्या सदस्यांच्या सूचना ऐकून घेण्यात आल्यात. सदस्यांनी यावेळी विशेषतः गोवंश, कुर्बानी नंतर उरलेले वेस्टेज, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर, अफवा व भडकाऊ पोस्ट्स रोखणे, आरोग्यविषयक समस्या, एकमेकांच्या धर्माविषयी आदर बाळगणे, सण एकत्रित साजरे करणे, अचानक उद्भवणाऱ्या अडचणीसाठी डायल ११२ चा वापर, बेकायदेशीर गोष्टींची माहिती पोलिसांना देणे, महानगरपालिकेच्या वाहनांनी कुर्बानीच्या दिवशी वेस्टेज उचलण्याची जबाबदारी, तसेच सणाच्या दिवशी बंदोबस्त तैनाती यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांनी शांतता कमिटीच्या सदस्यांना संबोधित करताना नमूद केले की, या बैठकीत सर्वांनी आपले विचार मांडले असून हा प्लॅटफॉर्म सकारात्मक पद्धतीने वापरला गेला, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी नमूद केले की, “पोलीस काय करीत आहेत हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, चर्चा झालीच पाहिजे. आज सर्व पोलीस अधिकारी आणि शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हेतू हाच आहे की, सण-उत्सव आपण कसे साजरे करतो, यामध्ये सलोखा, शांतता आणि सौहार्द टिकवणे अत्यंत आवश्यक आहे.” छत्रपती संभाजी महाराज जयंती, शिवराज्याभिषेक, वटपौर्णिमा, गुरू गोविंदसिंग जयंती आणि बकरी ईद हे आगामी महत्त्वाचे सण लक्षात घेऊन, पोलीस आयुक्तांनी विशेषतः महिला आणि मुलांचा सहभाग वाढवावा, वृद्ध महिलांनी स्वतः सांगितले पाहिजे की आपण हे सण चांगल्या पद्धतीने साजरे करत आहोत, असे सुचवले. शांतता समिती सदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर एसीपी आणि डीसीपी रँकचे अधिकारी काम करत आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढे पोलीस आयुक्त म्हणाले की, “आम्ही गुन्हेगारांचे घरे तपासत आहोत, त्यांना कार्यालयात बोलावून ताकीद देत आहोत. गंभीर गुन्हेगारांवर मकोका, तडीपार आणि एमपीडीए सारखे कठोर कायदे लावले जात आहेत. समाजकंटक भीती पसरवतात, पण आपण घाबरू नका – आम्हाला माहिती द्या, आम्ही त्वरित कारवाई करू. आपल्या शेजारी काही चुकीचे घडत असेल, क्रिमिनल अॅक्टिव्हिटी असेल, तर ती माहिती दिलीच पाहिजे. ही माहिती जर आपण देत नसाल, तर आपण आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत नाही.” असे पोलिस आयुक्त यांनी म्हटले.
शांतता कमिटीमधील सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचनांवर पोलीस आयुक्त यांनी वेस्टेज वेळेवर उचलण्याबाबत महापालिका यंत्रणेचे लक्ष वेधले असून, गोरक्षकांशीही बैठक घेऊन विनाकारण त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नियमांचे पालन झाले पाहिजे आणि कोणी ते पाळत नसेल, तर पोलिसांना कळवावे. “आपण पोलिसांबरोबर आहोत” हे स्पष्ट सांगितल्यास समाजकंटक आपोआप बाजूला होतील.दारू विक्रीबाबत आम्ही प्रचंड ताकदीने काम करत आहोत. आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी २४ तास, तहानभूक विसरून आपल्यासाठी काम करत आहेत. म्हणूनच, नागरिकांनी अभिमानाने म्हणावे की “आम्ही नागपूर शहराचे नागरिक आहोत!” आणि प्रत्येक सदस्याने आपल्या समितीमार्फत जनतेपर्यंत पोहचवावे – चुकीचे काम करू नका. सोशल मीडियाच्या संदर्भात, पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की कोणतीही पोस्ट पुढे शेअर करताना जबाबदारीने वागा. “फॉरवर्ड” केल्यावर त्यात आपला सहभाग असतो – त्यामुळे विचारपूर्वक कृती करा. सायबर पोलीस स्टेशनमध्ये अत्याधुनिक टूल्ससह सायबर लॅब उघडण्यात आली असून, Instagram, Facebook, WhatsApp, Snapchat यासारख्या प्लॅटफॉर्मवरील माहिती आम्हाला त्वरित मिळते. शेवटी, पोलीस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले की, आपण स्वतःचे आवाजात चांगले, सकारात्मक व्हिडीओ तयार करा, छोट्या Reel बनवा आणि समाजासाठी शेअर करा – जेणेकरून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ड्रग्स अॅवेअरनेस संदर्भात लवकरच केमिस्ट संघटनांशी बैठक घेतली जाणार आहे. अशा प्रकारे, शांतता कमिटीच्या माध्यमातून नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत चांगला संदेश पोहोचवून हे शहर अधिक सुंदर, सुरक्षित आणि सुसंस्कृत बनवावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी या बैठकीत शेवटी केले.
अपर पोलीस आयुक्त श्री. दाभाडे (उत्तर विभाग) यांनी शांतता समितीच्या बैठकीत समाज माध्यमांचा योग्य वापर, त्यावर अफवां पासून सावध राहणे आणि शांतता समितीच्या सदस्यांनी अशांत प्रवृत्तींमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही तीच भाषणे न होता, कृतीची भाषा बोलण्याची वेळ आली असल्याचे सांगून, शांतता समितीच्या सदस्यांनी समाजात भाऊबांधवांप्रमाणे राहून जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले. समाज रक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अनेकदा मदत करण्याऐवजी लोक फक्त शूटिंग करतात – ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. आपल्या आजूबाजूला बीट मार्शल, डायल ११२ सेवा कार्यरत असून त्यांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. गुंडांमध्ये हिंमत नसते, पण अशा प्रवृत्तींविरोधात माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे.
सह पोलीस आयुक्त श्री. नवीन चंद्र रेड्डी यांनी देखील सांगितले की, आता कृतीची वेळ आहे; केवळ सूचना न देता त्या तळागाळात पोहोचवल्या पाहिजेत. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आणि कायदा कुणासाठीही थांबत नाही. त्यामुळे शांतता समितीचे सदस्य हे समाजातील शांतता आणि सुरक्षिततेचे खरे रक्षक आहेत, असे.स्पष्ट केले.
या बैठकीकरिता नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री वसंत परदेशी, श्री राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त श्री लोहित मतानी, श्री निकेतन कदम, श्री राहुल मदने, श्रीमती मेहेक स्वामी, श्रीमती रश्मिता राव तसेच पोलीस मुख्यालयातील डॉ. अश्विनी पाटील, वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती बाविस्कर, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, १५० शांतता कमिटीचे सदस्य, प्रेस रिपोर्टर आणि छायाचित्रकार असे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांतता कमिटीच्या सदस्यांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीकरिता प्रभारी पोलीस उपायुक्त श्री शशिकांत सातव (विशेष शाखा), राखीव पोलीस निरीक्षक श्री विनोद तिवारी आणि इतर अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हे श्री नरेंद्र हिवरे, सहायक पोलीस आयुक्त अजनी विभाग, नागपूर शहर यांनी प्रभावी आणि समर्पित भावनेने पार पाडले.

