उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- देशात पत्नीकडून पतीच्या हत्येचे सत्र सुरू असताना सांगलीतून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. शरीरसंबंधांच्या भयातून वटपौर्णिमेच्या रात्रीच पत्नीने झोपेत असलेल्या आपल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घुण हत्या केली आहे. ही घटना कुपवाड येथे घडली असून, मध्यरात्री झोपेत पतीच्या डोक्यात घाव घातल्याने प्रतिकार करण्याची सुद्धा संधी त्याला मिळाली नाही. अनिल तानाजी लोखंडे वय 53 वर्ष रा. प्रकाशनगर, कुपवाड असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुपवाड पोलिसांनी पत्नी राधिका अनिल लोखंडे वय 27 वर्ष हिला बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक अनिल लोखंडे हे गवंडी काम करीत होते. त्याच्या पहिल्या पत्नी वैशाली हिचे 2 वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. मृतक अनिल यांना काजल व शिवानी या दोन मुली असून त्या विवाहित आहेत. त्यामुळे मृतक अनिल लोखंडे हे एकटेच घरी राहत होते. जेवणाचे हाल होत असल्यामुळे त्यांनी दुसरे लग्न वडी (ता. खटाव, जि. सातारा) येथील राधिकाशी केले. दोघांचा विवाह 23 मे रोजी मंदिरात संपन्न झाला होता.
अनिल व राधिका यांचे लग्न होऊन 18 दिवस झाले. 10 जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त राधिकाला मावस भावाच्या घरी अनिल लोखंडे यांनी सोडले. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अनिल राधिकाला घेऊन जाण्यासाठी आले. दोघेही रात्री घरी पोहचेले. राधिकाला शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा नव्हती. परंतू शरीरसंबंध ठेवण्यासाठी अनिल बोलत होते. मंगळवारी अनिल शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडतील, या विचारानं राधिकाला भीती वाटू लागली. त्या कारणावरून दोघांत वाद झाला. वादानंतर अनिल झोपी गेले. त्यावेळी पाणी पिण्यास किचन रूममध्ये जाण्याचे नाटक करून राधिकाने येताना कुऱ्हाड आणली. त्यानंतर अनिल यांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्यांचा खून केला.
जन्मापासून गर्भाशयाची पिशवी नाही: दरम्यान, राधिकाला जन्मापासून गर्भाशयाची पिशवी नसल्यामुळे मुलबाळ होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. अनिल यांनाही ही माहिती देण्यात आली होती. सोमवारी पती अनिल यांनी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले होते, तेव्हा राधिकाने नकार दिला होता. संबंध ठेवण्यास विरोध केला होता. मंगळवारी ते शरीरसंबंध ठेवतील अशी राधिकाला भीती वाटत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. अखेर तिने याच भीतीतून डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली.

