नासिर सुलेमान खान मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यभरात महिला अत्याचार, लैंगिक छळाच्या धक्कादायक घटना समोर येत असताना मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची भयंकर समोर आली आहे. कहर म्हणजे नराधमाने अत्याचार करत व्हिडिओ देखील शूट केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या प्रेयसी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई येथील जोगेश्वरी पूर्व भागात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकराने अनेक वेळा अत्याचार केला आहे. घरात कुणीही नसताना आरोपी तिच्या घरी यायचा आणि या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा. चार ते पाच वेळा अत्याचार करून त्याने चिमुकलीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर घातलं.
‘तुझ्या आईला जीवे मारून टाकीन’, अशी धमकी देत नराधमाने चिमुकलीचे लचके तोडले. यामुळे पीडित मुलगी भीतीच्या सावटाखाली जगत होती. अखेर त्रास असह्य्य झाल्यामुळे तिने आपल्या आईला आपबिती सांगितली. हा प्रकार मुलीच्या आईला कळल्यानंतर आरोपीने प्रेयसीवर टोकदार वस्तूने हल्ला केला.
या घटनेनंतर महिलेनं मेघेवाडी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत नराधम आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी 24 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या असून, आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्याच्या मोबाईल फोन मध्ये अनेक व्हिडिओ क्लिप डिलीट केलेल्या आढळल्या. पोलिसांनी मोबाईल तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

