मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील उपजिल्हा रुग्णालय विविध कारणामुळे नेहमी चर्चेत असते. त्यात आज एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात चक्क बेशुद्ध रुग्णाच्या अंगावर मुंग्या चढल्याचा प्रकार घडलाय. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचे स्वच्छतेचे पितळ उघडे पडले आहे.
एकीकडे राज्यात आरोग्य विभाग आरोग्य सुविधेच्या बाबतीत प्रचार प्रसार करून आपली पाठ थोपटत आहे. त्यात दुसरीकडे अनेक रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव, रुग्ण सेवेच्या उपकरणाची कमतरता, त्यात रुग्णाची गैरसोय असे प्रकार उघडकीस येत आहेत. अशातच हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहातून बाहेर आणलेल्या रुग्णाला आंतररुग्ण वॉर्डात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्ण शुद्धीवर नव्हता. या रुग्णाच्या शरीरावर काहीच वेळात मोठ्या प्रमाणात मुंग्या चढल्या. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात घडलेला हा प्रकार रुग्णालयाच्या स्वच्छतेचा बोजवारा सांगणारा आहे.
हिंगणघाट लगतच्या एका गावातील रुग्णावर उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला पुरुष आंतररुग्ण वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले. तेथे काही वेळातच त्याच्या सर्वांगावर मुंग्या चढल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्या सोबतच्या मित्राने याची माहिती वॉर्डमधील उपस्थित कर्मचाऱ्यास दिली. माहिती मिळताच रुग्णाला शस्त्रक्रिया कक्षात नेऊन पुन्हा तपासणी करण्यात आली आणि मुंग्या काढून टाकल्यानंतर रुग्णाची स्वच्छता करण्यात आली.
नुकतीच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे शरीरावर मुंग्यांचा मोठ्या प्रमाणात प्रकोप झाल्याच्या घटनेने रुग्णालयाच्या स्वच्छतेवर तसेच रुग्णांच्या काळजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुंग्यांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

