विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यातील जारावंडी ग्रामपंचायत मध्ये एकूण लोकसंख्या सुमारे पाच हजारांच्या घरात आहे. इतक्या मोठ्या ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन, विकास कामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पडण्यासाठी स्वतंत्र आणि नियमित ग्रामसेवकाची नितांत आवश्यकता आहे, अशी मागणी सध्या गावकऱ्यांतून तीव्र होत आहे.
सध्या जारावंडी ग्रामपंचायतीचा कार्यभार सेवारी येथील ग्रामसेवक मनोज गेडाम यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, सेवारी ही स्वतः एक मोठी ग्रामपंचायत असून, त्या ठिकाणीही अनेक योजनांची अंमलबजावणी आणि शासकीय कामे सुरु आहेत. त्यामुळे मनोज गेडाम हे दोन्ही गावांमध्ये पूर्णवेळ देता न आल्याने जारावंडीतील अनेक कामे प्रलंबित राहात आहेत. यामुळे ग्रामविकासात अडथळा निर्माण झाला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
जारावंडीमध्ये सध्या मोकाट गुरांचा त्रास वाढला आहे. मुख्य रस्त्यांपासून ते गावगड्यात आणि शाळा परिसरात गुरांचे लोंढे फिरत असतात. यामुळे अपघाताची शक्यता सतत निर्माण होते. दुसरीकडे, अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ भरलेला असून त्यांची नियमित सफाई होत नसल्याने अस्वच्छतेचा विळखा वाढत चालला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यामुळे डासांची संख्या आणि आजारांचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अनेक योजनांचे अर्ज प्रलंबित आहेत, घरकुल मंजुरी, वृद्धापकाळ , तसेच पाणीपुरवठा योजनेशी संबंधित तक्रारींचा निपटारा होण्यात विलंब होत आहे. ग्रामसेवक पूर्णवेळ गावात उपलब्ध नसल्याने नागरिकांना वारंवार पंचायत कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

