श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- मागील काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात महिला अत्याचाराच्या घटनेमुळे एकदा परत बीड हादरले आहे. येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे हातपाय बांधून शेतात टाकून दिल्याची घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे गतवर्षी देखील दोन वेळा असाच प्रकार घडला होता. त्यावेळी पालकांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन तरुणी ही बीडच्या शिरुर तालुक्यातील वडाळी गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुलगी घराच्या पाठीमागील बाजूस गेली होती. दरम्यान, 2 अज्ञात आले त्यांनी तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. यानंतर तिला गुंगी आली. ती जागेवरच बेशुद्ध झाली.
यानंतर अज्ञात आरोपींनी तिला ओढत शेतात नेलं. तसेच तिचा विनयभंग केल्याची माहिती आहे. नंतर तिथेच तिला बांधून शेतात टाकून दिले. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीच्या पालकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुलीची सुटका केली. संतप्त पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
2 अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपींविरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही अशीच घटना घडली होती. पालकांनी तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई झालेली नव्हती. मात्र, आता तिसऱ्यांदा ही घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतप्त वातावरण आहे. किमान आता तरी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी पालकांनी केली आहे..

