विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी
चोपडा:- संपुर्ण शहर व तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून भ्रष्टाचार होताना दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांंच्या माध्यमातून रस्त्यांचे खड्डे बुजविणे व भराव करणे याकरीता कोट्यवधी रुपयांची बोगस कामे होत आहेत. लाखाच्या कामांची बिले कोट्यवधीमध्ये काढली जात आहेत. सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैश्यांवर ठेकेदार, राजकारणी व शासकीय अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत. याला कुठेतरी अंकुश लागावा. याकरीता चोपडा तालुक्यात पक्षविरहित जनसंघर्ष मोर्चाचे गठन करण्यात येत आहे. यात जास्तीत जास्त सुजाण नागरिकांनी सामील व्हावे असे आवाहन अमृतराज सचदेव व माजी नगरसेवक डॉ. रविंद्र पाटील यांनी केले.
गेल्या पाच वर्षाच्या काळात तालुक्यासह शहरात कोट्यवधी रुपयाची विकास कामे केली जात आहेत. मात्र निकृष्ट कामांमुळे कोट्यवधी रुपयांच्या कामांचे आयुष्य मात्र काही महिन्यांचेच ठरत आहे. निकृष्ट दर्जाचे कामे करुन ठेकेदार, अधिकारी व राजकारणी हे मालामाल होत आहेत. जनतेच्या कराच्या पैशांचा हा साफ चुराडा होतांना दिसून येत आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार फोफावत आहे. या सर्व बाबींना आळा बसावा व विकासकामांचा दर्जा सुधारावा या एकमेव उद्देशाने भ्रष्टाचार हाणून पाडण्याकरीता जनसंघर्ष मोर्चा गठीत करीत असून यामध्ये सुजाण नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अमृतराज सचदेव व माजी नगरसेवक डॉ. रविंद्र पाटील यांनी केले आहे. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व व्हिजिलंस डिपार्टमेंट, महाराष्ट्र राज्य यांची मदत सुध्दा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

