विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली ६ ऑगस्ट:- एटापल्ली तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य उपचारासाठी चंद्रपूरला जाणे आवश्यक असते. मात्र, तपासण्या व उपचारानंतर सायंकाळी एटापल्लीकडे परतीसाठी कोणतीही सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सायंकाळी 5 वाजता चंद्रपूरहून एटापल्लीकडे जाणारी बससेवा सुरू करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपा) गडचिरोली जिल्हा कोन्सिलतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात भाकपाच्यावतीने उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“एटापल्ली तालुक्यातील अनेक नागरिक वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूरला जातात. सकाळी तेथे पोहोचणे शक्य होते, मात्र तपासण्या, औषधोपचार व इतर औपचारिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दुपार उलटून जाते. सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत काम पूर्ण होते. परंतु परतीसाठी कोणतीही बस उपलब्ध नसल्याने नागरिकांना मुक्कामी राहावे लागते, जे खर्चिक व वेळखाऊ ठरते.” या पार्श्वभूमीवर, संध्याकाळी 5 वाजता चंद्रपूरहून एटापल्लीकडे नियमित बससेवा सुरू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
या मागणीस भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी राज्य परिवहन प्रशासनाकडे त्वरीत प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली आहे. या निवेदनावर AIYF राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्यासह विजया जम्बोजवार, कॉ.जुबेदा शेख (आयटक), जयाताई पूडो, शालिनी नैताम, सरिता सोनी, निशा मोहूर्ले, वैशाली वाळके, पार्वती अंगती, राधाबाई गुमल सह अनेक नेत्याचा सह्या आहेत.

